Shoaib Bashir Ruled Out IND Vs ENG Test Series : लॉर्ड्स टेस्टमध्ये इंग्लंडने विजय मिळवला असला, तरी सामना संपल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या मालिकेतील पुढील दोन्ही कसोटीतून प्रमुख फिरकीपटू शोएब बशीर बाहेर पडला आहे. केवळ 20 वर्षांचा असलेला हा ऑफ-स्पिनर सध्या इंग्लंडचा मुख्य फिरकी गोलंदाज बनला होता. मात्र, लॉर्ड्समध्ये खेळलेल्या तिसऱ्या कसोटीत त्याच्या डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे त्याला आता शस्त्रक्रिया करावे लागणार आहे.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात बशीरच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला तात्काळ मैदानाबाहेर जावे लागले आणि भारताच्या पहिल्या डावात तो गोलंदाजीसाठी परतू शकला नाही. इंग्लंड व्यवस्थापनाने प्रथम त्याच्या पुनरागमनाची शक्यता दर्शवली होती, कारण भारताच्या दुसऱ्या डावात बशीरने पुन्हा गोलंदाजी केली होती आणि मोहम्मद सिराजची शेवटची विकेटही घेतली. पण आता स्पष्ट झाले आहे की, त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार असून उर्वरित मालिकेसाठी नसेल.
जिद्दीने खेळला बशीर
दुखापतीनंतरही बशीरने सामना मध्येच सोडला नाही. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात तो फलंदाजीसाठी उतरला आणि 9 चेंडू खेळले. त्यानंतर पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात तो पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि शेवटचा विकेटही घेतला.
या मालिकेत बशीरने 140.4 षटके म्हणजेच तब्बल 844 चेंडू टाकले, तीन सामन्यांत सर्वाधिक ओव्हर्स टाकणारा गोलंदाज ठरला. त्याने 54.1च्या सरासरीने 10 विकेट घेतले, जरी ही आकडेवारी प्रभावी नसेल, तरीही इंग्लंडने त्याच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला होता.
आता इंग्लंड काय करणार?
बशीरच्या अनुपस्थितीत इंग्लंडसमोर अनेक पर्याय आहे. जॅक लीच, जो बशीरच्या आगमनानंतर बाहेर गेला होता, तो फिट असेल तर त्याला पुनः संधी मिळू शकते. याशिवाय रेहान अहमद, टॉम हार्टली आणि लियाम डॉसन हे पर्याय देखील आहेत. स्क्वॉडमध्ये आधीपासूनच असलेला जैकब बेटेल हा अतिरिक्त फिरकी आणि फलंदाजीचा पर्याय म्हणून विचारात येऊ शकतो.
शोएब बशीरची दुखापत इंग्लंडसाठी मोठा झटका आहे. मालिकेत सध्या 2-1 ने आघाडीवर असला तरी स्पिन विभागात भारताने स्पष्ट वर्चस्व गाजवले आहे. अशा स्थितीत उर्वरित दोन सामन्यांसाठी इंग्लंडला अधिक चांगले डावपेच आखावे लागतील.
हे ही वाचा -