Gujarat Giants vs Manipal Tigers : मणिपाल टायगर्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला आहे.  लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव केला. 


लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये झालेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट 2022 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सनं  मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव केला. गुजरात जायंट्सनं आठ विकेट्सच्या मोबदल्यात 121 धावांचा यशस्वी पाठलाग करत दोन विकेट्सनं सामना जिंकला.  गुजरात जायंट्सकडून पार्थिव पटेलने सर्वाधिक 34 धावांची खेळी केली. तर मणिपाल टायगर्सचा कर्णधार हरभजन सिंह, मुरलीधरण, परविंदर अवाना आणि मपोफू यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. 


मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव - 
121 धावांचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची सुरुवात खराब झाली. कर्णधार विरेंद्र सेहवाग स्वस्तात माघारी परतला. मपोकूनं विरेंद्र सेहवागला अवघ्या एका धावेवर बाद केले. गुजरातला दुसरा धक्काही मपोकूनेच दिला. मपोकूने विस्फोटक दिलशानला शून्य धावसंख्येवर क्लीन बोल्ड केले.  दोन विकेट झटपट गेल्यानंतर गुजरातचा संघ अडचणीत सापडला होता. पण पार्थिव पटेल आणि केविन ओ ब्रायन यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी मोठी भागिदारी केली. पार्थिव पटेल 34 धावा करुन परविंदर अवानाच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मागील सामन्यात शतकी खेळी करणारा केविन ओ ब्रायनही बाद झाला. परविंदर अवानाने केविन ओ ब्रायनला बाद केले. केविन ओ ब्रायन 23 धावा काढून बाद झाला. पार्थिव आणि ओ ब्रायन बाद झाल्यानंतर लेंडल सिमंस आणि थिसारा परेरा यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरात जायंट्सनं मणिपाल टायगर्सचा दोन विकेट्सनं पराभव केला. 


मणिपाल टायगर्सची  121 धावांपर्यंत मजल -


दरम्यान, त्यापूर्वी मणिपाल टायगर्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधाराचा निर्णय गुजरातच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. 15 धावसंख्येवर मणिपाल टायगर्स संघाला धक्का बसला. शिवकांत शुक्ला (11) स्वस्तात तंबूत परतला. तीस धावांच्या आत मणिपाल संघाला तीन धक्के बसले. स्वपनिल (5) आणि तातेंदा तायबू (1) स्वस्तात तंबूत परतला. लागोपाठ विकेट पडल्यानंतर मोहम्मद कैफ आणि रविकांत शुक्लानं संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद कैफनं 24 धावांची खेळी केली.  तर रविकांत शुक्लानं सर्वाधिक 32 धावांची खेळी केली. मणिपाल टायगर्सचा कर्णधार हरभजन सिंह याने अखेरच्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. हरभजन सिंह याने 18 धावांची खेळी केली.