Team India T20 World Cup 2024 Celebration : विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियावर आत कौतुकांसह बक्षिसांचाही वर्षाव होत असल्याचं दिसून येतंय. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेले महाराष्ट्राच्या चार खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. शुक्रवारी विधीमंडळात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असून त्यावेळी बक्षिसही देण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


विजयी टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत झालं असून वानखेडे स्टेडिअमवर त्यांचा सत्कार केला जात आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित आहेत. 


शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ही रक्कम शुक्रवारी जाहीर करणार आहेत. 


टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव


वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम होत असून या ठिकाणी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. 


टीम इंडियाचे मुंबईत जल्लोषात स्वागत


विश्वविजय मिळवलेल्या टीम इंडियाचं गुरुवारी मुंबईत सायंकाळी आगमन झालं. तत्पूर्वीच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर क्रिकेटप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मुंबईच्या सागराशेजारी जनसागर उसळल्याचं पाहायला मिळालं. तीन लाखाहून जास्त चाहत्यांनी या ठिकाणी गर्दी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


सर्वप्रथम मुंबई विमानतळावर अग्निशमन दलाच्यावतीने टीम इंडियाच्या विमानाला वॉटर सॅल्यूट देण्यात आला आहे. त्यानंतर स्पेशल बसमधून टीम इंडिया मुंबईतील वानखेडे मैदानावर पोहोचली. वानखेडे मैदानावर टीम इंडियाच्या स्वागताला मोठी गर्दी झाली असून मैदान गच्च भरलं आहे. तर वानखेडे मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा जनसागर उसळल्याचं दिसून येत आहे.


जिकडे तिकडे क्रिकेटप्रेमी आणि भारतीय संघाच्या स्वागताला जमलेले क्रिकेट चाहते दिसून येत आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील गर्दी पाहाता मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मरीन ड्राईव्हकडे आता नागरिकांनी येऊ नये असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.


ही बातमी वाचा: