Ranji Trophy 2022 Semifinals : पश्चिम बंगालचा पराभव करत मध्य प्रदेशनं रणजी चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. रणजी क्रिकेटच्या 88 वर्षांच्या इतिहासात मध्य प्रदेश संघाने दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. उपांत्य फेरीत मध्य प्रदेशनं पश्चिम बंगालवर 174 धावांनी विजय नोंदवलाय. आता फायनलमध्ये मध्य प्रदेशचा सामना बलाढ्य मुंबईसोबत होणार आहे.  


मध्य प्रदशने पहिल्या डावात 341 धावांचा डोंगर उभारला होता. मध्य प्रदेशकडून हिमांशू मंत्री (165) आणि अक्षत रघुवंशी (63) यांनी दमदार फलंदाजी केली होती. पश्चिम बंगालकडून मुकेश कुमारने 4 तर शाहबाज अहमदने तीन विकेट घेतल्या होत्या. मध्य प्रदेशने दिलेल्या 341 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पश्चिम बंगालचा डाव 273 धावांत संपुष्टात आला होता.  पश्चिम बंगालकडून शाहबाज अहमदने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले. शाहबाजने पहिल्या डावात 116 धावांची खेळी केली. होती. त्याशिवाय मनोज तिवारी याने 102 धावांची खेळी केली होती. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. मध्य प्रदेशकडून पुनित दातेय आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी चार चार विकेट घेतल्या. 


 










पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाल्यानंतर मध्य प्रदेशनं दुसर्या डावात चांगली सुरुवात केली. पण शाहबाज अहवाद आणि प्रदिपता प्रमाणिक यांच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजी कोसळली. मध्य प्रदेशचा दुसरा डाव 281 धावांत संपुष्टात आला. मध्य प्रदेशकडून अदक्य श्रीवास्तव (82) आणि रजत पाटीदार (79) यांनी अर्धशतकी खेळी केली. विजयासाठी मिळालेल्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना पश्चिम बंगालची सुरुवात निराशाजनक झाली. पश्चिम बंगालचा दुसरा डाव अवघ्या 175 धावांत संपुष्टात आला. पश्चिम बंगालकडून अभिमान्य इश्वरन याने सर्वाधिक 78 धावांची खेळी केली. त्याशिवाय शाहबाज अहमद याने नाबाद 22 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशकडून कुमार कार्तिकेय याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर गौरव यादव याने तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.