ICC WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघाने  (Team India) 13 मार्च रोजी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेविरुद्धच्या क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडने सामन्यातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवताच, टीम इंडिया कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. विशेष म्हणजे भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी, टीम इंडियाने 2019-21 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. भारतीय कसोटी संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या क्रमांकावर आहे ते जाणून घेऊ...


टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर 


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम फेरीत प्रवेश केलेला भारतीय संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या विजयी गुणांची टक्केवारी 58.8 टक्के आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी टीम इंडियाच्या मार्गात अनेक चढउतार आले. मात्र भारताने सर्व वादळांवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. ICC जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या हंगामात, भारताने 18 कसोटी सामने खेळले ज्यात टीम इंडियाने 10 जिंकले आणि 5 सामने गमावले. दरम्यान, तीन कसोटी अनिर्णित राहिल्या. आता टीम इंडियाचा WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. लंडनच्या ओव्हल मैदानावर 7 जूनपासून दोन्ही संघांमधील विजेतेपदाची लढत होणार आहे.


कशी आहे इतर संघांची स्थिती?


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या स्थानावर आहे. कांगारू संघाला 66.67 टक्के गुण आहेत. ऑस्ट्रेलियाने यंदाच्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 19 सामने खेळले, 11 जिंकले, 3 हरले आणि 5 सामने अनिर्णित राहिले. याशिवाय दक्षिण आफ्रिका संघ 55.56 गुणांसह तिसर्‍या, श्रीलंका 48.48 गुणांसह चौथ्या, इंग्लंडचा संघ 46.97 गुणांसह पाचव्या, 38.1 टक्के गुणांसह पाकिस्तान संघ सहाव्या, 34.62 टक्के गुणांसह वेस्ट इंडिज संघ सातव्या, 33.33  टक्के गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 11.11 टक्के गुणांसह आठव्या स्थानावर असून बांगलादेशचा संघ 11.11 टक्के गुणांसह नवव्या स्थानावर आहे.


अशी झाली भारताची WTC फायनलमध्ये एन्ट्री


अहमदाबाद येथील घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS 4th Test) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना भारतीय संघ खेळला. या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला किंवा त्यात भारताचा पराभव झाला, असता तर श्रीलंकेला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली असती. त्यानुसार सामना अनिर्णीत राहिला पण श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सामन्यात श्रीलंकेने आधी 355 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 373 धावा केल्या. मग श्रीलंकेचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपल्यावर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी 8 गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत सामना जिंकला. ज्यामुळे भारताची गुणतालिकेतील स्थिती मजबूत झाली असून भारत थेट WTC Final साठी पात्र ठरला. 


हे देखील वाचा-