India vs Sri lanka, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जात आहे. मालिकेतील हा दुसरा सामना कोलकात्याच्या प्रसिद्ध ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर (Eden Gardens cricket stadium) खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका जिंकता येईल तर श्रीलंकेला बरोबरी साधता येईल यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ...
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. ज्याचे कारण म्हणजे मैदानाची इतर ग्राऊंड्सच्या तुलनेच असणारी छोटी सीमारेषा. ईडन गार्डनच्या चौरस सीमारेषेची लांबी 66 मीटर आहे. तर सरळ बाजूच्या सीमेची लांबी 69 मीटर आहे. त्यामुळे याठिकाणी उच्च स्कोअरिंग सामना होण्याची अपेक्षा आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. सामन्यादरम्यान दव पडेल का ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम गोलंदाजी करायची असेल हे नक्की.
कसं असेल कोलकात्याचं वातावरण?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादिवशी अर्थात 12 जानेवारीला भारत आणि श्रीलंका वनडे सामन्याच्या दिवशी दुपारी थोडासं वातावरण उष्म असेल. तर सायंकाळनंतर तापमानात घट होईल. गुरुवारी कोलकात्यात दिवसाचे तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, रात्रीच्या वेळी त्यात घट होईल आणि ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. सामन्याच्या दिवशी कोलकातामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात होणारा दुसरा सामना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारत जिंकल्यास मालिकाही होणार नावावर
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेून मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
हे देखील वाचा-