India vs New Zealand, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. मालिकेतील हा दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका जिंकता येईल तर न्यूझीलंडला सामना जिंकून बरोबरी साधता येईल. यामुळे आजच्या महत्त्वाच्या सामन्यात मैदानाची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ...
रायपूर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल
सामना होणाऱ्या रायपूर क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी भारतातील इतर विकेट्सप्रमाणे फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथील विकेट टी-20 सामन्यांसारखी असेल ज्याच्या सरासरीने 170 धावा केल्या होत्या. पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी इथली खेळपट्टी स्लो होत जाईल. म्हणजे वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकीपटू अधिक प्रभावी ठरतील. रायपूरची विकेट पाहता नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारल्यानंतर फिरकीपटूंच्या माध्यमातून नंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव आणणे ही कर्णधारांची रणनीती असणार यात शंका नाही. त्यामुळे पहिल्या वन-डेप्रमाणे एक हायस्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. विशेष म्हणजे रायपूरच्या या मैदानात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जात आहे...
कसं असेल कोलकात्याचं वातावरण?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्यादिवशी अर्थात आज दुपारनंतर रायपूरमध्ये थोडीशी थंडी असेल. दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. रात्री तापमानात घट होईल आणि पारा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरेल. भारत-न्यूझीलंड सामन्याच्या दिवशी रायपूरमध्ये पावसाची शक्यता नाही. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हवामानाशी संबंधित कोणताही अडथळा नसावा अशी अपेक्षा आहे.
भारत जिंकल्यास मालिकाही होणार नावावर
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 12 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे जर आता दुसरा एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला तर भारत एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊन मालिकाही नावावर करेल. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ मालिकेत बरोबरी साधून आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
हे देखील वाचा-