PAK vs NZ Khushdil Shah : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना माउंट मौंगानुई येथे खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानला 43 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि मालिका 0-3 अशी गमावली. मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटनाही पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान एका पाकिस्तानी खेळाडूची चाहत्यांशी झटापट झाली. हे प्रकरण इतके वाढले की सुरक्षा रक्षकाने या खेळाडूला थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चाहत्यांना मारण्यासाठी धावला पाकिस्तानी खेळाडू
पाकिस्तानी क्रिकेटपटू खुसदिल शाह एका मोठ्या वादात अडकला आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात तो चाहत्यांशी भांडताना दिसला. खरंतर, सामन्यादरम्यान मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी काही कमेंट केल्या होत्या. त्यानंतर खुसदिल शाहचा संयम सुटला. त्याने सीमारेषेजवळील रेलिंगवरून उडी मारली आणि चाहत्यांमध्ये पोहोचला. त्याच वेळी, पाकिस्तान संघाचे क्रिकेटपटू आणि काही सुरक्षा कर्मचारी खुसदिल शाहला थांबवताना दिसत आहेत. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे फोटो सोशल मीडियावर आले आहेत आणि व्हायरल होत आहेत.
खुसदिल शाह टी-20 मालिकेदरम्यानही चर्चेत होता. त्यानंतर त्याने एका सामन्यादरम्यान फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाज फोक्सला मारले होते. त्यावेळी त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली. त्याला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि तीन डिमेरिट पॉइंट्सही मिळाले.
न्यूझीलंडनं मालिका घातली खिशात
पावसामुळे दोन्ही संघांमधील हा सामना 42-42 षटकांचा खेळवण्यात आला. ज्यामध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 42 षटकांत 8 गडी गमावून 264 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक 59 धावा केल्या. दुसरीकडे, 265 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तान संघ केवळ 40 षटकांत 220 धावांवरच गारद झाला. याचे सर्वात मोठे कारण बेन सीयर्स होते. त्याने 9 षटकांत फक्त 34 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. बाबर आझम वगळता पाकिस्तानचा कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही.
हे ही वाचा -