England vs India 3rd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर रंगलेल्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा शेवट अत्यंत थरारक झाला. सामना संपण्याआधी इंग्लंड संघ फलंदाजीस उतरला, पण फक्त एकच ओव्हर खेळू शकला. या दरम्यान इंग्लिश फलंदाजांनी टाइमपास करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. याचवेळी शुभमन गिल आणि इंग्लंडच्या बेन डकेट व झॅक क्रॉली यांच्यात किरकोळ वाद झाला.

या प्रकारावर आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जोनाथन ट्रॉट भडकले असून, त्यांनी गिलच्या वागणुकीवर टीका केली आहे. ट्रॉट म्हणाले की, गिलने जसा अ‍ॅक्टिंग मोड ऑन केला आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर बोट दाखवून उभा राहिला, तो प्रकार त्यांना अजिबात आवडला नाही.

Jio Sports स्टुडिओमध्ये बोलताना ट्रॉट म्हणाले की, “शुभमन गिलने इंग्लिश खेळाडूंना ज्या पद्धतीने बोट दाखवलं आणि झॅक क्रॉलीसमोर उभं राहिला, ते मला खटकलं. मला माहीत नाही की इंग्लंड फील्डिंग करत असताना नक्की काय घडलं होतं, पण एक कर्णधार म्हणून तुम्ही मैदानावरचं वातावरण ठरवता. आणि असं वागणं शोभत नाही.”

ते पुढे म्हणाले, “तुम्ही लोकांच्या अंगावर जाताय, बोट दाखवताय, अगदी काही जुना कर्णधार जसा विरोधकांच्या तोंडासमोर उभा राहत असत, तसंच काहीसं गिल करत होता. प्रतिस्पर्धी भावना मैदानावर असायलाच हवी, पण त्यालाही मर्यादा असतात. काही वेळा ती मर्यादा ओलांडणं टाळायला हवं. कालच्या घटनेमुळे मात्र पुढचा दिवस आणखीनच रंगतदार ठरेल.

भारत आणि इंग्लंड सध्या बरोबरीत... 

लॉर्ड्स येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना बरोबरीत आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली आणि 387 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानेही चांगली फलंदाजी केली, पण त्यांनाही फक्त 387 धावा करता आल्या. यामुळे पहिल्या डावात दोघांचीही धावसंख्या बरोबरीत आली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस खूप कमी वेळ शिल्लक होता. इंग्लंड फलंदाजीसाठी आला पण फक्त एक षटक टाकता आले. यामध्ये इंग्लिश संघाने फक्त 2 धावा केल्या.

जर भारतीय संघाला मालिकेत आघाडी घ्यायची असेल, तर चौथ्या दिवशी चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि इंग्लंडला कमी धावांवर बाद करावे लागेल. यामुळे भारताला एक छोटे लक्ष्य मिळेल आणि ते विजय नोंदवण्यात यशस्वी होऊ शकतात. जर इंग्लंडचे फलंदाज चौथ्या दिवशीही टिकून राहिले तर भारतासाठी विजयाचा मार्ग खूप कठीण होऊ शकतो.