Jhulan Goswami in India vs England Match : इंग्लंडच्या भूमीत भारत आणि इंग्लंड (India vs England) महिला संघामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताची दिग्गज आणि सर्वात अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) तिच्या कारकिर्दीतील अखेरची एकदिवसीय मालिका खेळत आहे. नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजी निवडली असून झुलनने या सामन्यात मैदानात उतरत पहिली विकेट घेत एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे.


विशेष म्हणजे झुलन पहिल्यांदाच वनडे सामन्यांत भारताची माजी कर्णधार मिताली राजशिवाय मैदानात उतरत आहे. तिने इतक्या वर्षे सामने खेळले असून प्रत्येक सामन्यात सोबत मिताली राज होती. पण काही महिन्यांपूर्वीच मितालीनं क्रिकेटला अलविदा केला ज्यामुळे आता झुलन आज एकटीच मैदानात उतरली आहे. झूलनने 2002 पासून 2022 पर्यंत तब्बल 201 वन डे सामने खेळले आहेत. पण आजच्या सामन्यात तिने एक खास रेकॉर्ड नावे केलं आहे. झुलनने या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर कॅथरीन फिट्जपॅट्रिकचं रेकॉर्ड तोडलं आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामन्यांत विकेट्सचा रेकॉर्ड झुलननं तोडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीनच्या नावावर 23 विकेट्स असून झुलनं सामन्यातील आपली पहिली विकेट घेत 24 विकेट्स पूर्ण करत नवा रेकॉर्ड रचला आहे.






 


टीम इंडियाने जिंकली नाणेफेक 


सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघाचा विचार करता हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाखाली दमदार संघ मैदानात उतरला आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा यांनी सलामी केल्यानंतर हरमनप्रीत कौर, हरलीन देवोल मधल्या फळीत असतील. अष्टपैलू दिप्ती शर्मा तसंच विकेटकिपर यस्तिका भाटियाही संघात असणार आहे. पुजा वस्त्रकर, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह यांच्यावर गोलंदाजीची धुरा असणार आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ आपल्या तगड्या खेळाडूंसह मैदानात उतरला असून अॅलिस कॅप्सी ही आज सलामीचा सामना खेळत आहे.


भारतीय संघ


स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देवोल, दिप्ती शर्मा, यस्तिका भाटिया, पुजा वस्त्रकर, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंह. 


इंग्लंडचा संघ


एम्मा लॅम्ब, टॅमी ब्यूमॉन्ट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, डॅनियल व्याट, एमी जोन्स, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, केट क्रॉस, इस्सी वोंग   


हे देखील वाचा-