Jaydev Unadkat's Tweet : बांगलादेशच्या मीरपूर येथे नुकतीच भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेतील (IND vs BAN) दुसरा कसोटी सामना पार पडला. भारतानं सामना 3 विकेट्सने जिंकला आणि मालिकाही नावावर केली. पण याशिवाय आणखी एक खास गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा भारतीय संघात परतला. त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीतील हा दुसरा कसोटी सामना होती. त्याने 12 वर्षांपूर्वी पहिला कसोटी सामना खेळला होता. दरम्यान 12 वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन केल्यावर उनाडकटने एक खास भावूक पोस्ट शेअर केली आहे आणि सोबत एक फोटोही शेअर केला आहे.


उनाडकटने त्याच्या कसोटी पदार्पणाची आणि 12 वर्षांनंतर खेळलेल्या मीरपूर कसोटीची जर्सी सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या कारकिर्दीतील या दोन कसोटी सामन्यांच्या दोन जर्सी शेअर करून त्याने आपल्या 12 वर्षांच्या दीर्घ प्रवासातील संघर्षाचं वर्णन केलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जर्सीवर त्या-त्या सामन्यातील सहकारी खेळाडूंची स्वाक्षरी देखील आहे.


12 वर्षांपूर्वी केलं होतं कसोटी पदार्पण


जयदेव उनाडकटने डिसेंबर 2010 मध्ये कसोटी पदार्पण केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत त्याला प्रथमच कसोटी जर्सी घालण्याची संधी मिळाली. मात्र, या कसोटीत त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली. 26 षटके टाकल्यानंतर आणि 100 हून अधिक धावा केल्यानंतर त्याला एकही विकेट मिळाली नाही. या पदार्पणाच्या कसोटीत त्याच्यासोबत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग हे दिग्गज होते. त्यांची सही या जर्सीवर आहे. तर 12 वर्षांनंतर पुन्हा कसोटी संघात सामील झाल्यावर त्याने पुन्हा एकदा आपल्या जर्सीवर सहकारी खेळाडूंच्या सह्या घेतल्या. चेतेश्वर पुजारा, उमेश यादव आणि राहुल द्रविड हे असे लोक होते, ज्यांच्या सही उनाडकटच्या दोन्ही जर्सीवर दिसतात. या जर्सींसोबत उनाडकटने त्याची टेस्ट कॅप क्रमांक 267 हे कॅप्शन शेअर केलं आहे.






मीरपूर कसोटीत घेतल्या 3 विकेट्स


12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जयदेव उनाडकटने मिळालेल्या संधीचा सदुपयोग केला. मीरपूर कसोटीत त्याने 67 धावा देत तीन विकेट्स घेतले. या कसोटीतील पहिला विकेट त्याच्या खात्यात गेला. या कामगिरीनंतर उनाडकटला आणखी कसोटी सामने खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा-