R Ashwin Batting Record : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर आर. अश्विनने (R Ashwin) बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीसह चमकदार कामगिरी केली. अश्विनने या सामन्यात 6 विकेट्स घेत नाबाद 42 धावांची मॅचविनिंग खेळी केली. या खेळीनंतर त्याने दमदार असा रेकॉर्ड यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये करुन दाखवला आहे.  अश्विनच्या यंदाच्या कसोटी कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.


अश्विनसाठी ​2022 ठरलं खास


आर अश्विनसाठी 2022 हे वर्ष फलंदाजीच्या दृष्टीने खूप खास होते. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये यावर्षी विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकून त्यांच्याहून अधिक धावा केल्या आहेत. अश्विनने यावर्षी एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 30.00 च्या सरासरीने आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 270 धावा केल्या आहेत. त्याचवेळी विराट कोहलीनेही या वर्षात 6 सामने खेळले असून त्याला केवळ 265 धावा करता आल्या आहेत. अश्विनने केवळ गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही भारतासाठी मॅचविनिंग खेळी केली आहे. दुसरीकडे, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. पंतने यावर्षी 7 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने 680 धावा केल्या आहेत, तर त्याची सरासरी 61.81 आहे.


अश्विनने 9व्या क्रमांकावर फलंदाजी करत केला विक्रम 


बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रवीचंद्रन अश्विनने भारताकडून 9व्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाचा डाव सावरताना 42 धावांची नाबाद खेळी केली. य़ा खेळीमुळेच भारत तीन गडी राखून सामना जिंकला. दरम्यान या खेळीसह अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्ट इंडिजचा फलंदाज विन्स्टन बेंजामिनचा एक मोठा विक्रम मोडला आहे. 1988 मध्ये बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध 9व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 40 धावा केल्या होत्या. आता अश्विनने 42 धावा करत हा विक्रम मोडीत काढला आहे. अश्विन आता कसोटीत 9व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.


हे देखील वाचा-