Jay Shah on World Test Championship Finals : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे सचिव जय शाह यांनी 2023 मध्ये जी चूक झाली होती ती चूक भारतीय संघासोबत होणार नाही असे आश्वासन दिले आहे. खरंतर, आयपीएल 2023 ची फायनल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मधील अंतर खूपच कमी होते. ज्यामुळे भारतीय संघाला थोडा त्रास सहन करावा लागला. 



त्यानंतर सलग दुस-यांदा अंतिम फेरी गाठूनही भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकता न आल्याने आयपीएलवर जोरदार टीका झाली. मात्र, आता जय शाह यांनी आश्वासन दिले आहे की आयपीएल फायनल आणि डब्ल्यूटीसी फायनलमध्ये चांगले अंतर असेल.



आयपीएल 2025 च्या समाप्तीनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा अंतिम सामना होणार आहे, जो लॉर्ड्सवर खेळला जाईल. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलपूर्वी खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळायला हवा त्यासाठी दोघांमध्ये निश्चित अंतर असले पाहिजे.


आत्ताच खेळल्या गेलेल्या (2021 आणि 2023) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन्ही फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवामुळे आयपीएलवर टीका झाली होती. आयपीएलनंतर लगेचच भारतीय खेळाडूंना कसोटीशी जुळवून घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. पण या टीका पूर्णपणे फेटाळून लावत जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, या सर्व गोष्टी असूनही भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दोन्ही चक्रांमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे.



दरम्यान, पुढील योजनांबद्दल बोलताना जय शाहने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर भारतीय संघावर होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आणि ते म्हणाले की, "आयपीएल खेळूनही भारतीय संघ शेवटच्या दोन्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळला आहे. अशा परिस्थितीत, आता भविष्यातील योजना लक्षात घेऊन, आम्ही ठरवले आहे की यापुढे आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये 15 दिवसांचे अंतर राहिल. दोन्ही वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल आपल्या भारतीय संघाचे कौतुक करायला हवे.






भारतीय संघाला पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारतीय संघ पुन्हा एकदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघ सध्या 9 पैकी 6 सामने जिंकून आणि 2 सामने गमावल्यानंतर 68.51 पीसीटीसह WTC गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.