England vs India 4th Test Update : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्ध चौथा टेस्ट खेळणार की नाही, हे अजून स्पष्ट नाही. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी इशारा दिला होता की हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बुमराहच्या खेळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय सामन्याच्या दिवशी घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

बुमराह खेळला नाही, तर अर्शदीप सिंग उत्तम पर्याय अजिंक्य रहाणे

या दरम्यान, भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेने सांगितले की, जर बुमराह चौथा टेस्ट खेळत नसेल, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंग हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना रहाणे म्हणाला की, इंग्लंडसारख्या परिस्थितीत डावखुरा वेगवान गोलंदाज फायदेशीर ठरतो. अर्शदीप दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करू शकतो आणि स्पिनर्ससाठी रफ तयार करण्यासाठी योग्य अ‍ॅगलने गोलंदाजी करतो. त्यामुळे बुमराह उपलब्ध नसेल, तर अर्शदीपलाच संधी द्यायला हवी.

अर्शदीपची टेस्ट डेब्यूची प्रतीक्षा

अर्शदीप सिंगने अद्याप टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. मात्र त्याने 21 प्रथम श्रेणी सामन्यांत 66 बळी घेतले आहेत. त्याच्या खेळण्याबाबत एक अडचण अशी आहे की, बेकेनहॅममधील सराव सत्रात त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. सहायक प्रशिक्षक डोशेट यांनी यावर सांगितले की, सरावादरम्यान चेंडू थांबवताना त्याच्या हाताला कट लागला आहे आणि तो किती खोल आहे, हे पाहावे लागेल.

भारतासाठी 'करो या मरो'ची लढाई

भारत सध्या पाच टेस्ट सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. चौथा टेस्ट सामना 23 जुलैपासून मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतासाठी 'करो या मरो'सारखा आहे. जर हा सामना हरला, तर भारत ही मालिका गमावेल. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला काही कठोर निर्णय घेऊन सर्वोत्तम संघ मैदानात उतरवावा लागेल.

इंग्लंड दौऱ्यासाठी 18 खेळाडूंचा भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, ऋषभ पंत (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव.

हे ही वाचा -

Mohammed Shami : 'कमबॅक' मिशन सुरू! मोहम्मद शमीची IPL नंतर संघात झाली निवड, कधी दिसणार मैदानात?