Team India T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) खेळवला जात आहे. भारतीय संघ यंदा चषकाचा दावेदार आहे, पण स्पर्धेपूर्वीच भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. ज्यामुळे भारताचा बोलिंग अटॅक कमकुवत झाला आहे. अशामध्ये बुमराहच्या जागी अनुभवी मोहम्मद शमी (Mohammad Shami) संघात आला आहे, पण बुमराहची डेथ ओव्हर गोलंदाजी करण्याची ताकद तितकी कोणत्याच गोलंदाजामध्ये नसल्याने सर्व भारतीयांसह टीम इंडियासमोर विश्वचषकात रणनीती कशी असेल? आणि बोलिंग अटॅक कसा असेल? असे प्रश्न पडले आहेत.


विश्वचषकाची संघ निवड होण्यापूर्वी भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे स्पर्धेबाहेर झाला. त्यानंतर बुमराह दुखापतीतून सावरुन संघात परतला ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेत तो मैदनातही उतरला, पण स्पर्धेला काही दिवस शिल्लक असताना पाठीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेला मुकणार ही मोठी बातमी समोर आली. ज्यानंतर मात्र भारतीय संघ पुरता हादरला. कारण याआधीच्या सामन्यात बुमराह विश्रांतीवर असताना डेथ ओव्हरमध्ये भारताची गोलंदाजी मोठा प्रश्न होता, कारण सर्वच गोलंदाजांना बऱ्याच धावा खाव्या लागत होत्या. त्यात विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेला बुमराह मुकणार असल्याने डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी कोण करणार? हा प्रश्न सर्वांना सतावू लागला. बुमराहच्या जागी दीपक चाहर किंवा मोहम्मद शमी संघात येईल अशी चर्चा होती. पण चाहरही दुखापतग्रस्त झाला आणि संघ व्यवस्थापनानं अनुभवी शमीला निवडलं. 


अर्शदीपचा पर्याय


आता विश्वचषकात भारताच्या गोलंदाजीबद्दल म्हटलं तर सुरुवातीला ओव्हर्स करुन विकेट्स घेण्यासाठी भुवनेश्वर कुमार सक्षम आहे. शमीही त्याला साथ देऊ शकतो. याशिवाय फिरकीपटू आश्विन, चहल आणि अक्षर पटेल हे आहेतच. पण मोठा प्रश्न आहे डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजीचा. आता याचा विचार करता शमीवर अधिक अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे यावेळी युवा डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंह हा पर्याय टीमसमोर आहे. आयपीएलमध्ये चमकलेला अर्शदीप भारतासाठी महत्त्वाचा पर्याय असणार आहे. 


कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह


राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर 


हे देखील वाचा-


SL vs NAM T20 WC 2022 : Underdog समजल्या जाणाऱ्या नामिबियाची विजयी सलामी, सलामीच्या सामन्यात श्रीलंकेवर 55 धावांनी मिळवला विजय