Brett Lee on Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना भंबेरी भरवली आहेच. पण प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या मनातही त्याच्या गोलंदाजीची भीती आहे. बुमराह कोणत्याही खेळपट्टीवर आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भेदक मारा करण्यात तरबेज आहे. बुमराहच्या गोलंदाजीचे जगभरात कौतुक होतेच. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यालाही बुमराहच्या गोलंदाजीची भूरळ पडली आहे. ब्रेट ली याने पीटीआयसोबत बोलताना जसप्रीत बुमराहचे कौतुक केलेय. जसप्रीत बुमराह बर्फाच्या खेळपट्टीवरही गोलंदाजी करु शकतो, अशी कौतुकाची थाप ब्रेट ली याने टाकली आहे. इतकेच नाही तर विश्वचषकात बुमराह सर्वोत्कृष्ट ठरू शकतो, असं भाकितही केलेय. ब्रेट ली यानं यंदाचा आयपीएल हंगाम कोण जिंकेल? याबाबतही माहिती दिली. 


बुमराहबद्दल ब्रेट ली काय म्हणाला ?


जसप्रीत बुमराह कुठेही गोलंदाजी करू शकतो. बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. जगातल्या कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची क्षमता जसप्रीत बुमराह याच्याकडे आहे. आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरीही दमदार राहील. तो सर्वोत्तम गोलंदाजामध्ये असेल, असे ब्रेट ली म्हणालाय.  






कोलकाता तिसऱ्यांदा चषक उंचावणार - 


सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये यंदाची आयपीएल फायनल होईल. कोलकाता नाईट रायडर्स चषकावर नाव कोरेल, असं मला वाटतेय.  साखळी फेरीत ते पहिल्या क्रमांकावर होते. यंदा आयपीएल चषक जिंकण्यासाठी त्यांच्याकडे सर्वकाही आहे, त्यांनी तसे प्रयत्नही केले आहेत, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली म्हणाला. 


लीजेंड्स इंटरकॉन्टिनेंटल टी20 लीगमध्ये खेळणार ब्रेट ली - 


ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली लीजेंड्स इंटरकॉन्टिनेंटल टी20 लीगमध्ये खेळणार आहे. ब्रेट ली याच्याशिवाय इंग्लंडचा ग्रीम स्वान, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आणि भारतीय विकेटकीपर पार्थिव पटेल हे या स्पर्धेत खेळणार आहेत. गुरुवारी अमेरिकेत याबाबतची घोषणा करण्यात आली. इंडो किंग्स, आशियन एवेंजर्स, यूरो रेंजर्स, अमेरिकन माव्हेरिक्स, ट्रान्स-तस्मान टाइटन्स, अफ्रीकन लायंस आणि कॅरेबियन वायकिंग्स या संघामध्ये स्पर्धा रंगणार आहे. यातील आघाडीचे चार संघ नॉकआऊटमध्ये पोहचतील.  लीजेंड्स इंटरकॉन्टिनेंटल टी20 लीगमध्ये 24 सामने होणार आहे. साखळी स्पर्धेत प्रत्येक संघ इतर संघासोबत प्रत्येकी दोन दोन सामने खेळणार आहे.  28 ऑगस्ट रोजी अंतिम सामना रंगणार आहे.