BCCI Announced Team India squad For T20 World Cup 2026 : 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले. त्यातील सर्वात चर्चेचा निर्णय म्हणजे इशान किशनची (Ishan Kishan) दमदार पुनरागमनासह निवड झाली. तर शुभमन गिलला (Shubman Gill) संघातून वगळले आहे. सुमारे दोन वर्षांपासून टीम इंडियापासून दूर असलेला इशान किशन अखेर पुन्हा एकदा निळ्या जर्सीत परतताना दिसणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने केलेली जबरदस्त कामगिरी हीच त्याच्या निवडीची मुख्य कारणीभूत ठरली. 

Continues below advertisement

Continues below advertisement

नशिबाने नव्हे, कामगिरीने संधी 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इशानने अक्षरशः धुमाकूळ घातला. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तसेच 500 हून अधिक धावा करत झारखंडला जेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. त्याची आक्रमक फलंदाजी, सातत्य आणि नेतृत्वगुण लक्षात घेता निवड समितीने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. बीसीसीआयकडून ही निवड म्हणजे इशानच्या मेहनतीला मिळालेली मोठी पावतीच म्हणावी लागेल.

दुसरीकडे, शुभमन गिलबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा गिल मात्र टी-20 प्रकारात अपेक्षित सातत्य राखू शकलेला नाही. गेल्या काही काळातील कमकुवत फॉर्म आणि प्रभावहीन कामगिरीमुळे निवड समितीने त्याला 2026 च्या टी-20 विश्वचषक संघातून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला आहे.

इशान किशनचं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये धमाकेदार शतक

झारखंडचा कर्णधार इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धमाकेदार शतक ठोकून खळबळ उडवून दिली होती. किशनने अंतिम सामन्यात हरियाणाविरुद्ध 101 धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान इशान किशनने संजू सॅमसनचा विक्रम मोडत अनेक विक्रम प्रस्थापित केले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 ही इशानसाठी उल्लेखनीय कामगिरी होती. त्याने केवळ कर्णधार म्हणूनच नव्हे तर फलंदाज म्हणूनही असाधारण कामगिरी केली. या हंगामात त्याने खेळलेल्या 10 सामन्यांमध्ये इशानने एकूण 262 चेंडूंचा सामना करत 517 धावा केल्या. त्याची सरासरी 57.44 होती, तर त्याचा स्ट्राईक रेट 197.32 होता. या सामन्यांमध्ये इशानने 51 चौकार आणि 33 षटकार मारले.

टीममधून बाहेर का ठेवण्यात आलं होतं?

खरं तर, 2023 साली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात ईशान किशन संघाचा भाग होता. मात्र वैयक्तिक कारणांचा हवाला देत त्याने कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीही खेळली नाही आणि काही काळासाठी देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहिला. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने त्याच्याविरोधात कडक पाऊल उचलत त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या यादीतून वगळले. मात्र ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये जोरदार पुनरागमन करत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सातत्यपूर्ण आणि दमदार प्रदर्शनाच्या जोरावर त्याने पुन्हा एकदा टीम इंडियात आपली जागा पक्की केली.

टी-20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडिया (Team India squad For T20 World Cup 2026) -

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, इशान किशन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा

हे ही वाचा -

Team India squad For T20 World Cup 2026 : चक दे इंडिया! टी-20 विश्वचषक 2026 साठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादव कर्णधार, शुभमन गिलचा पत्ता कट, पाहा 15 जणांचा तगडा Squad