आयपीएलमध्ये अभिषेक शर्माने गेल्या वर्षी शतक ठोकल्यानंतर मैदानातच खिशातून चिठ्ठी काढली आणि त्याची जगभर चर्चा झाली. यंदाच्या हंगामात उर्विल पटेल, रघु आणि आकाश सिंग यांनीही खिशातून चिठ्ठी काढली आणि चाहत्यांचे लक्ष वेधले. पण क्रिकेटमध्ये खिशात रणनीती किंवा आकडेवारीची चिठ्ठी ठेवण्याची परंपरा नवी नाही. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा अशीही घटना घडली होती, जेव्हा चिठ्ठीचा वापर रणनीतीसाठी नाही, तर एका महान दिग्गजाला थेट उत्तर देण्यासाठी करण्यात आला होता.

Continues below advertisement

ही घटना 2012 मध्ये घडली होती. दिनेश रामदिन या वेस्ट इंडिजच्या माजी यष्टीरक्षक-फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत असे चिठ्ठी कांड केले होते, ज्याने संपूर्ण क्रिकेटविश्व हादरले होते. मैदानावर खेळाडूंमध्ये स्लेजिंग आणि शाब्दिक चकमकी सामान्य असतात, पण स्वतःच्या देशातील महान दिग्गजालाच प्रत्युत्तर देणे, ही गोष्ट इतिहासात नोंदली गेली.

टीकेला दिले अनोखे उत्तर

Continues below advertisement

त्या मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये रामदिन सतत खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी वेस्ट इंडिजचे महान फलंदाज व्हिव्ह रिचर्ड्स यांनी त्याच्या विकेटकीपिंग आणि फलंदाजीवर कठोर टीका केली होती. “रामदिनचा खेळ खूप घसरला आहे,” असे व्हिव्ह रिचर्ड्स यांनी म्हटले होते. ही टीका रामदिनच्या मनाला लागली आणि त्याने उत्तर देण्यासाठी एक आक्रमक आणि वेगळाच मार्ग निवडला. एजबेस्टन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रामदिनने अप्रतिम फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने 107 धावांची खेळी केली आणि शतक पूर्ण होताच सगळ्यांना धक्का बसला.

रामदिनने खिशातून आधीच लिहून ठेवलेली एक पांढरी चिठ्ठी बाहेर काढली आणि ती कॅमेऱ्यांसमोर दाखवली. त्या चिठ्ठीवर मोठ्या अक्षरांत लिहिले होते की, हो व्हिव्ह, आता बोला ना. हे थेट व्हिव्ह रिचर्ड्स यांना दिलेली एक खुले आव्हान होते. विशेष म्हणजे त्या वेळी व्हिव्ह रिचर्ड्स बीबीसी रेडिओसाठी कॉमेंट्री बॉक्समध्येच उपस्थित होते.

ICC ची कारवाई; दंडही बसला

रामदिनने बॅटने स्वतःला सिद्ध केले होते, पण एका महान माजी कर्णधाराची अशा पद्धतीने खिल्ली उडवणे हे क्रिकेटच्या भावना आणि शिस्तीविरुद्ध मानले गेले. त्यामुळे आयसीसीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. मॅच रेफरी रोशन महानामा यांनी रामदिनच्या कृतीला लेव्हल-1  गुन्हा ठरवत त्याच्यावर कारवाई केली. शिक्षा म्हणून त्याच्या मॅच फीपैकी 20 टक्के रक्कम कापण्यात आली.

नंतर आली चूक लक्षात

काही काळानंतर दिनेश रामदीन याला स्वतःच्या या भावनिक आणि आक्रमक वागण्याचा पश्चात्ताप झाला. त्याने माध्यमांसमोर मान्य केले की तो त्या वेळी खूप भावनिक झाला होता आणि क्रिकेटमधील इतक्या मोठ्या दिग्गजाविरुद्ध अशी वागणूक देणे चुकीचे होते. वर्षांनंतर एका मुलाखतीत रामदिन म्हणाला की, “वय आणि अनुभव वाढल्यानंतर मला समजले की ती कृती चुकीची होती.” आता त्याचे आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांचे संबंध पूर्णपणे सामान्य आणि चांगले आहेत.

हे ही वाचा -

CSK vs SRH Live Update IPL 2026 : चेन्नई-हैदराबाद लढतीकडे संपूर्ण IPLचं लक्ष, MS धोनीबाबत मोठी अपडेट, प्लेऑफची शर्यत कोण जिंकणार?