Virat Kohli Record : टीम इंडिया आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार 'रनमशीन' विराट कोहलीने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. टी- 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावाचा टप्पा पार करणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आयपीएल 2021 च्या दुबई येथे सुरु असलेल्या सामन्यात विराटने ही कामगिरी केली आहे. विराट कोहली टी - 20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करणारा पाचवा खेळाडू आहे. 


विराटच्या पुढे कोणते खेळाडू आहेत?


विराटने 10 हजाराचा टप्पा पार केला मात्र असं करणारा तो पाचवा खेळाडू आहे. यात वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. गेलने टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 14 हजार 275 धावा केल्या आहेत. त्यानंतर वेस्ट इंडिजचाच कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने या फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 11 हजार 195 धावा केल्या आहेत. 


पाकिस्तानचा शोएब मलिक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 10 हजार 808 धावा केल्या आहेत आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर यादीत चौथ्या स्थानावर आहेत. वॉर्नरच्या नावे 10 हजार 19 धावा आहेत. वॉर्नरने देखील यंदाच्या आयपीएलमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला होता. 


आजच्या सामन्यात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहच्या एका चेंडूवर षटकार लगावला आणि टी 20 मध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्याआधी विराटला 10 हजारांचा टप्पा पार करण्यासाठी 13 धावांची आवश्यकता होती.  या सामन्यापूर्वी विराट कोहलीने 313 टी -20 सामन्यांच्या 298 डावात 42 च्या सरासरीने 9987 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट 134 आहे. विराटने टी- 20 सामन्यांमध्ये 886 चौकार आणि 316 षटकार लगावले आहेत. विराटने टी -20 मध्ये आजवर 5 शतके आणि 73 अर्धशतके ठोकली आहेत.


विराटची टी 20 इंटरनॅशनलमधील कामगिरी


टी 20 इंटरनॅशनलबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने 90 सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 3159 धावा केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी -20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. टी-20 मध्ये 28 अर्धशतके त्याच्या नावे आहेत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय टी -20 मध्ये त्याने आजवर एकही शतक साजरं केलं नाही. नाबाद 94 धावांची त्याची खेळी ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.