Ajinkya Rahane : भारतीय संघातील (Indian Cricket Team) एक अनुभवी फलंदाज असणारा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागील काही काळापासून खराब फॉर्ममुळे टीकांचा धनी झाला आहे. कसोटी संघाचं उपकर्णधारपदही रहाणेकडून काढून घेण्यात आलं असून आता आगामी कसोटी मालिकेत त्याला संधी मिळणंही कठीण झालं आहे. या सर्वानंतर रहाणेने आता यावर प्रतिक्रिया देताना 'माझ्या खेळाबद्दल क्रिकेट जाणकारांना माहिती आहे, तसंच माझ्या ऑस्ट्रेलियातील निर्णयाचं श्रेयही दुसऱ्यानी घेतलं आहे.' असं रहाणे म्हणाला.


भारतीय संघात मागील काही काळापासून अनेक बदल होत आहे. विराटने (Virat Kohli) एक-एक करत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर खेळाडूंच्या जागाही बदलू लागल्या आहेत. यात कसोट संघातील दोन महत्त्वाचे फलंदाज अजिंक्य आणि चेतेश्वर यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांच्यावर अनेकांकडून टीका होत आहेत. दोघांची संघातील जागाही आता डळमळीत झाली आहे. त्यात माजी उपकर्णधार असल्यामुळे रहाणेवर तर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. ज्यानंतर आता एका ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बोलताना रहाणे म्हणाला, 'ज्यांना क्रिकेटबद्दल कळतं ते अशाप्रकारची टीका करत नाहीत. मला अशा गोष्टींवर हसू येतं. ज्यांना क्रिकेटबद्दल कळतं त्यांना माहित आहे, ऑस्ट्रेलियामध्ये काय झालं होतं. मी यावर जास्त बोलू इच्छित नाही. मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जे निर्णय घेतले होते, त्याचं श्रेय दुसरं कोणीतरी घेतलं आहे.'


भारताने ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकताना ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. यावेळी महत्त्वाच्या सामन्यांत विराट जागी रहाणे कर्णधार होता. पण त्यानंतर रहाणेने खास कामगिरी न केल्यामुळे आता त्याला संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे.


मागील वर्षभर रहाणेची बॅट थंड


भारतीय कसोटी संघातील विश्वासू फलंदाज तसंच माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला 2021 मध्ये खास फलंदाजी करता आली नाही. मागील संपूर्ण वर्षभर त्याचं बॅटींग अॅव्हरेज केवळ 20 इतकचं होतं. लॉर्ड्स आणि मेलबर्नशिवाय कोणत्याच ठिकाणी त्याला मोठा स्कोर करता आला नाही. दरम्यान त्याला अजूनही त्याच्या कामगिरीवर भरोसा असून आणखी क्रिकेट खेळण्याची इच्छा असून तो आगामी रणजी चषकातही सहभाग घेणार आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha