Team India for ODI World Cup 2023 : भारतीय संघ सध्या आशिया चषकामध्ये व्यस्त आहे. भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसरा सामना नेपाळविरोधात होणार आहे. त्याआधी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. आज, विश्वचषकासाठी भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर श्रीलंकामधून भारतीय संघाची घोषणा करणार आहेत.
आशिया चषका 2023 साठी 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश करण्यात आला. तर बॅकअप खेळाडू म्हणून संजू सॅमसन याची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी अजित आगरकर कर्णधार रोहित शर्मासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. 15 सदस्यीय संघामध्ये काही नावे जवळपास निश्चित आहेत. गोलंदाज आणि विकेटकिपर यांच्याबाबत निर्णय होणार आहे. 5 सप्टेंबरपर्यंत आयसीसीकडे 15 सदस्यीय संघाची नावे द्यायची आहेत. आज, तीन सप्टेंबर रोजी विश्वचषकासाठी भारताचे कोणते शिलेदार असणार, यावरुन पडदा उठणार आहे.
राहुलचे स्थान जवळपास निश्चित, तिलक-संजू अन् सूर्यावर होणार निर्णय -
विश्वचषकासाठी 15 खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघातील खेळाडूच निवडले जातील, अशी चर्चा आहे. 17 सदस्यीय संघातील तीन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. त्यामध्ये तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या नावाचा समावेश आहे. विकेटकिपर फलंदाज लोकेश राहुल याचे नाव जवळपास निश्चित मानले जातेय. पण त्याच्या फिटनेसबाबत अंतिम निकाल आल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. राहुलची निवड न झाल्यास संजू सॅमसन याला संधी मिळू शकते. श्रेयस अय्यरच्या कमबॅकमुळे सूर्यकुमार यादव याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह आहे. सूर्यकुमार यादव याच्या जागी भारतीय संघात अतिरिक्त फिरकी गोलंदाजाला स्थान दिले जाऊ शकते. आज भारतीय संघाचे अंतिम 15 शिलेदार समजतील. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषकात उतरणार आहे. वनडे विश्वचषकाचे यजमनापद भारताकडे आहे. 5 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
विश्वचषकासाठी भारताचा संभाव्या संघ -
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव/युजवेंद्र चहल/आर. अश्विन
बॅकअप - संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा