Kapil Dev On Suryakumar Yadav : भारतीय खेळाडू सूर्यकुमार यादवसाठी (Suryakumar Yadav) ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकतीच संपलेली तीन सामन्यांची वनडे मालिका एखाद्या वाईट स्वप्नासारखी होती. या मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये सूर्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान, विश्वविजेता कर्णधार आणि माजी भारतीय खेळाडू कपिल देव यांनी सूर्याचा बचाव करताना संजू सॅमसनशी त्याची तुलना करू नका, असंही म्हटले आहे.


एबीपी न्यूजशी विशेष संवाद साधताना सूर्याच्या कामगिरीबद्दल कपिल देव म्हणाले की, ज्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे त्याला अधिक संधी द्यायला तुम्हाला नेहमीच आवडेल. यावेळी तुम्ही सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसनसोबत करू नये. जर सॅमसन अशा फॉर्ममधून जात असेल तर तुम्ही इतर कोणाबद्दल बोलू लागला असता. असे अजिबात होऊ नये. या वक्तव्यादरम्यान कपिल देव यांनी संघ व्यवस्थापन आणि कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयाचा बचाव करत म्हटले की, संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला असेल, तर लोक काहीही बोलत असतील तरी शेवटी काय करायचं हा पूर्णपणे व्यवस्थापनाचा निर्णय असेल.


टी20 मध्ये हिट पण ODI मध्ये फक्त 24 ची सरासरी


सध्या, सूर्यकुमार यादव आयसीसी वर्ल्ड टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे आणि या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या 1 ते 2 वर्षातील त्याची या फॉरमॅटमधील उत्कृष्ट कामगिरी. सूर्याने आतापर्यंत 48 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 46.53 च्या सरासरीने एकूण 1675 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतकांसह 13 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, जर आपण सूर्याचा एकदिवसीय विक्रम पाहिला तर त्याची 23 सामन्यांत केवळ 24ची सरासरी आहे, ज्यामध्ये केवळ 2 अर्धशतकांचा समावेश आहे.


गोल्डन डकचा नकोसा विक्रम सूर्यासह मास्टर ब्लास्टरच्याही नावावर


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चेन्नईत खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अॅस्टन अगरनं पहिल्याच चेंडूवर माघारी धाडलं. सूर्या आऊट झाला अन् त्यानं 'गोल्डन डक'च्या हॅट्रिकचा विक्रम आपल्या नावावर रचला. मात्र, सूर्याच्या आधीही अनेक भारतीय फलंदाजांनी वनडेमध्ये गोल्डन डकची हॅट्रिक केली आहे. या यादीत सर्वात मोठं नाव आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. जो 1994 मध्ये सलग तीन एकदिवसीय सामन्यांत शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर अनिल कुंबळे, झहीर खान, इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनीही वनडेत शून्यावर बाद होण्याची हॅट्ट्रिक रचली आहेच.


हे देखील वाचा-