Virat Kohli vs Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) वनडेतील शतकांच्या विक्रमाची रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli ) बरोबरी केली आहे. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची वनडेमध्ये प्रत्येकी 49 शतके आहेत. आज विराट कोहलीला सचिनचा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. वानखेडेच्या मैदानावर विराट कोहली शतकांचे अर्धशतक करणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज उपांत्य फेरीचा सामना होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 


उपांत्य फेरीत भारतीय संघाचा विजय व्हावा, याची सर्वच आशा करत आहेत. त्याशिवाय विराट कोहली वानखेडेवर सचिन तेंडुलकरसमोरच त्याचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडेल, अशी आशाही सर्वांना आहे. उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी सचिन तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर आलाय. त्याच्यासमोरच एका भारतीय खेळाडूने त्याचा सर्वात मोठा विक्रम मोडणं, म्हणजे ऐतिहासिकच होय. आज विराट कोहली हा विक्रम मोडणार का ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 


 सर्व भारतीय विराट कोहलीच्या 50 व्या शतकांची वाट पाहत आहे. सेमीफायनलसारख्या सामन्यात विराट कोहलीने सचिनच्या शतकांचा विक्रम मोडावा, असेही काहींचे म्हणणे आहे. विराट कोहली या अपेक्षांवर खरा उतरतो का ? हे पुढील काही तासांतच समजेल. 


वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची कामगिरी -


विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 290 सामने खेळले आहेत. यामधील 278 डावात त्याने 58.44 च्या सरासरीने आणि 93.54 च्या स्ट्राईक रेटने 13677 धावांचा पाऊस पाडलाय. विराट कोहलीच्या खात्यात आतापर्यंत 49 शतकांची नोंद आहे. तर 71 अर्धशतकेही विराटच्या बॅटमधून निघाली आहेत. विराट कोहलीने अतिशय कमी सामन्यात सचिनच्या सर्वाधिक शतकांची बरोबरी केली आहे. 


सचिन तेंडुलकरची वनडेमधील कामगिरी -


क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकरने 452 वनडे डावात 44.8 च्या सरासरीने तब्बल 18 हजार 426 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान त्याने 49 शतके ठोकली आहेत. त्याशिवाय 96 अर्धशतकेही लगावली आहेत. यादरम्यान त्याने 195 षटकार आणि 2016 चौकारांचा पाऊस पाडला आहे. सचिन तेंडुलकर वनडेमध्ये 41 वेळा नाबाद राहिला आहे. सचिन तेंडुलकरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 धावा इतकी आहे.  


Virat Kohli vs Sachin Tendulkar Comparison,  सचिन आणि विराटची नेहमीच तुलना -


सचिन तेंडुलकरच्या विक्रमांची बरोबरी करणे कोणत्याही खेळाडूला अशक्य आहे, पण अनेक वेळा सध्या खेळणाऱ्या खेळाडूंची तुलना क्रिकेटच्या देवासोबत केली जाते. यामध्ये सर्वात मोठं नाव म्हणजे, विराट कोहलीचं होय. स्वत: सचिन तेंडुलकरनेही माझा विक्रम विराट कोहली अथवा रोहित शर्मा मोडतील, असं वक्तव्य केले होते. विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा आणि शतकांचा पाऊस पडल्यानंतर अनेकांनी त्याची तुलना सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. पण  या दोन दिग्गजांची तुलना करणं कठीण आहे, कारण दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या युगात राहत होते आणि दोघांच्या काळात क्रिकेटचा खेळ सारखा नव्हता.