World Cup 2023 : मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी. या सामन्यात यजमान भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. 2019 मधील कटू आठवणी आजही ताज्या आहेत. आजच्या सामन्याकडे  140 कोटी देशवासियांना आशा आहेत. भारताचे पाच खेळाडू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरतील. या खेळाडूंकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. पाहूयात त्यांच्याबद्दल



रोहित शर्मा: यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माने आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाना बॅकफूटवर ढकलले. रोहित शर्माने वेगवान सुरुवात केल्यामुळे इतर फलंदाजांना मैदानावर थिरावण्यास वेळ मिळाला. रोहित शर्माने 55.85 च्या सरासरीने आणि 121 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 503 धावा चोपल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माने सर्वाधिक षटकारही लगावलेत. त्यामुळे आजही रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 


विराट कोहली : किंग विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. आतापर्यंत विराट कोहलीची बॅट तळपली आहे. त्याने सात डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्यात. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाजही विराट कोहलीच आहे. विराट कोहलीने 9 सामन्यात 99 च्या सरासरीने 594 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये पाच अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे. आज विराट कोहली न्यूझीलंडला नडेल, अशीच अपेक्षा आहे. 



श्रेयस अय्यर: विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात अडखळणारा श्रेयस अय्यरची बॅट आता चांगलीच तापली आहे. अय्यरच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. मागील चार सामन्यात त्याने धावांचा रतीब घातालय. अय्यरने 9 सामन्यात 421 धावांचा पाऊस पाडलाय. त्याची सरासरी 70 इतकी जबरदस्त आहे. आघाडीची फळी ढेपाळली तर डाव सावरण्याची जबाबदारीही अय्यर याच्यावर असेल. त्याला वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव आहे. ही त्याची जमेची बाजू आहे. 



जसप्रीत बुमराह: यंदाच्या विश्वचषकात भारताचा सर्वात मोठा खेळाडू जसप्रीत बुमराह असेल. बुमराहने अचूक टप्प्यावर भेदक मारा केलाय. बुमराहच्या गोलंदाजीचा सामना या विश्वचषकात दिग्गजांना करता आला नाही. पावरप्लेमध्ये बुमराह अधिक घातक गोलंदाजी करतो. त्याशिवाय अखेरच्या टप्प्यातही त्याने प्रतिस्पर्धी संघाना अडचणीत टाकलेय. बुमराहने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत 17 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय सर्वाधिक निर्धाव चेंडूही बुमराहने टाकले आहेत. 


मोहम्मद शमी : पहिल्या चार सामन्यात मोहम्मद शामीला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. पण हार्दिक पांड्याला दुखापत झाली अन् शामीची लॉटरी लागली. शामीने त्यापुढील पाच सामन्यात भेदक मारा केला. न्यूझीलंडविरोधात धरमशालाच्या मैदानात त्याने पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यापुढील सामन्यात चार विकेट घेतल्या. इतकेच नाही तर वानखडेच्या मैदानात लंकेविरोधात त्याने पाच विकेट घेतल्या होत्या. शामीचा फॉर्म भारताला फायनलमध्ये पोहचू शकतो.  शामीने पाच सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत.