हैदराबाद : भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौर यांचं शुक्रवारी (20 नोव्हेंबर) निध झालं. गौस हे 53 वर्षांचे होते आणि त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दु:खाची बाब म्हणजे कोरोनाव्हायरसच्या निर्बंधांमुळे सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहता येणार नाही.


मोहम्मद सिराजचे वडील रिक्षाचालक होते. हालाखीच्या परिस्थितीत असतानाही केवळ मुलाचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण कमाई सिराजसाठी खर्च केली हीत. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर संघाकडून खेळणारा मोहम्मद सिराज पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. परंतु मुलाला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्याचं त्याच्या वडिलांचं स्वप्न अधुरं राहिलं.


वडिलांच्या निधनानंतर मोहम्मद सिराजने एक भावूक मेसेज दिला आहे. हा मोठा धक्का आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला. मला देशासाठी खेळताना पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं आणि मला आनंद आहे की, मी त्याचं स्वप्न पूर्ण करुन त्यांना आनंद दिला."


मोहम्मद सिराज भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. तिथे भारतीय संघ बायो बबलमध्ये आहेत. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्याला मायदेशी परतता येणार नाही. परिणामी तो वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार नाही.


याआधी आयपीएल 2020 दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मनदीप सिंहच्या वडिलांचंही निधन झालं होतं. परंतु कोरोनाच्या नियमांमुळे तोही भारतात परतला नव्हता.


आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलाचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रिक्षा चालवून घर सांभाळलं. त्यांची कमाई फार नव्हती. तरीही मुलाच्या स्वप्नांमध्ये ही बाब कधीच आणली नाही. त्यांनी हैदराबादच्या रस्त्यावर रिक्षा चालवून आणि मुलाला छोट्या गल्लीतून बाहेर काढून मोठ्या स्टेडियमपर्यंत पोहोचवण्यास मदत केली.


आरसीबीनेही याबाबत ट्वीट करुन आदरांजली वाहिली आहे. "वडिलांना गमावणाऱ्या सिराजं आम्ही सांत्वन करतो. आमच्या प्रार्थना त्याच्या आणि कुटुंबीयांसोबत आहेत. या कठीण प्रसंगात संपूर्ण आरसीबी कुटुंब तुझ्यासोबत आहे. कणखर राहा, असं आरसीबीने ट्वीटमध्ये लिहिलं आहे.





सिराजने भारतासाठी एक वन डे आणि तीन ट्वेण्टी-20 सामने खेळले आहेत. त्याने टी-20 मध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. 2017 मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळलेल्या सामन्यातून पदार्पण केलं होतं. त्याने आयपीएलमध्ये 35 सामने खेळले असून 39 विकेट्स घेतल्या आहेत.