Kedar Jadhav Father Missing : टीम इंडियामध्ये (Indian Cricket Team) अष्टपैलू भूमिका निभावलेला भारतीय अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याचे वडील महादेव जाधव हे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पुण्यातील कोथरूड भागातून आज (सोमवारी) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाल्याचे समजत आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव हा कुटुंबासोबत पुण्याच्या कोथरूड भागात राहायला आहे. महादेव जाधव हे आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेऊन गेले. मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा स्विच ऑफ लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांकडे महादेव जाधव यांची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुणे पोलिस पुढील तपास करत आहे.
काही दिवसांपूर्वी केदार अडकला होता आणखी एका अडचणीत
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या केदार जाधवने आसाम विरुद्ध अप्रतिम द्विशतक झळकावलं होतं. पण त्यानंतर काही दिवसांत त्याने खाजगी कारण देत तो महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू रणजी सामना अर्ध्यावरती सोडून बाहेर पडला. ज्यानंतर बारामती येथे तो एका कार्यक्रमात दिसून आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत केदार दिसून आला. दरम्यान एक महत्वाची क्रिकेट स्पर्धा सुरु असताना असं खोटं कारण देत त्यातून बाहेर पडणं चुकीचं आहे. याबाबत बीसीसीआयकडे तक्रार करणार असून कितीही मोठा खेळाडू असला तरी असं वागणं बरोबर नाही. असं करायचं असल्यास क्रिकेट सोडून घरी बसावं, असंही इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले होते.
केदार जाधवची कमाल फलंदाजी
बराच काळ मैदानापासून दूर असणाऱ्या केदारनं काही दिवसांपूर्वी आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. जाधवची फलंदाजी सर्वांसाठीच चर्चेचा विषय बनली होती. सामन्यात त्याने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करताना 283 चेंडूत 283 धावा केल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 12 षटकार मारले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे महाराष्ट्र मजबूत स्थितीत पोहोचला होता. केदारने बऱ्याच कालावधीनंतर एवढी मोठी खेळी केली होती.
आयपीएल लिलावात राहिला 'अनसोल्ड'
इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) स्पर्धेत सीएसके संघाकडून खेळणारा केदार जाधव सीएसकेपासून (CSK) वेगळा झाल्यानंतर त्याला आयपीएल लिलावात कोणत्याही फ्रेंचायझीने विकत घेतलेले नाही. गेल्या दोन हंगामात तो आयपीएल लिलावात अनसोल्डच राहिला.मागील वर्षी 23 डिसेंबर रोजी झालेल्या 2023 च्या आयपीएल लिलावातही (IPL Mini Auction) त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. यापूर्वी तो CSK संघाचा भाग होता. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 नंतर त्याला भारतीय संघातूनही वगळण्यात आले. मात्र आसामविरुद्ध 283 धावांची धडाकेबाज खेळी केदार जाधवने केल्यामुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला होता.
हे देखील वाचा-