मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचं ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्त्वं करत अतिशय महत्त्वाच्या अशा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघाला विजयी मार्गावर नेणाऱ्या आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या, अजिंक्य रहाणे यांनं क्रीडारसिकांसमवेत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचंही मन जिंकलं. त्याच्या संयमी नेतृत्त्वाची ठिकठिकाणी प्रशंसा झाली. पण, आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाची धुरा सुट्टीहून परतणाऱ्या विराट कोहलीच्याच हाती असणार आहे. त्यामुळं यावर अजिंक्यची काय प्रतिक्रिया असेल, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. याचं उत्तर खुद्द अजिंक्यनंच दिलं आहे.


'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना अजिंक्यनं निर्विवादपणे विराटच संघाचा कर्णधार असून आपण जेव्हा गरज असेल तेव्हा संघाचं नेतृत्त्वं करण्यासाठी आहोतच अशी लक्षवेधी आणि मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली. अजिंक्य रहाणेवर पुन्हा एकदा संघाच्या उपकर्णधारपदाची जबबादारी असेल तर, इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा विराट कोहली भूषवेल. याचबाबत प्रतिक्रिया देत अजिंक्यनं त्याची बाजू स्पष्ट केली आहे.

Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम- शरद पवार


काय म्हणाला अजिंक्य?


'काहीही बदलेलं नाही. विराट यापुर्वी आणि यापुढंही कसोटी संघाचा कर्णधार असेल आणि मी उपकर्णधार. त्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्वं करणं हे माझं कामच होतं आणि संघाच्या विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करणं ही माझी जबाबदारी होती', असं अजिंक्य म्हणाला.
इथं कर्णधारपद महत्त्वाचं नसून, त्या पदाला साजेशी कामगिरी तुम्ही नेमकी कशा प्रकारे बजावता हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत मी यशस्वी ठरलो, आशा करतो की यापुढंही हे चित्र असंच राहील. माझ्या संघासाठी अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा माझा मानस असेल, हे अजिंक्यनं स्पष्ट केलं.


विराटसोबतचं नातं नेमकं कसं?


विराट आणि माझं नातं नेहमीच चांगलं राहिलं आहे. आम्ही दोघांनीही एकत्र अशा अनेक स्मरणीय खेळी संघासाठी खेळल्या आहेत, असं म्हणत अजिंक्यनं विराटसोबचं नातं सर्वांपुढे ठेवलं.


कर्णधार म्हणून विराट कोहलीबाबत काय वाटतं?


विराटच्या कर्णधारपदामध्ये अनेक बारकावे असून, प्रत्येकासाठी त्याच्या परिभाषा वेगळ्या आहेत. अजिंक्यनंही विराट एका कर्णधाराच्या रुपात नेमका कसा आहे, या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'तो एक अतिशय तीक्ष्ण वृत्तीचा कर्णधार आहे. मैदानात तो प्रशंसनीय निर्णय घेतो. त्याला माझ्याकडूनही फार अपेक्षा आहेत आणि मी आशा करतो की त्याचा अपेक्षाभंग कधीच होऊ देणार नाही', असं अजिंक्य म्हणाला.