India vs Zimbabwe: आज भारत आणि झिम्बाब्वेचा यांच्यात दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 4.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाचा पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करेल, अशी आशा आहे. तसेच भारतीय संघात दुसऱ्या टी-20 साठी कोणताही बदल न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ आज कोणत्या रणनिती घेऊन मैदानात उतरणार आणि पराभवाचा वचपा काढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


टी-20 विश्वविजेत्या भारतीय संघाला झिम्बाब्वेने 13 धावांनी पराभूत केले. या विजयासह झिम्बाब्वेने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र भारतीय संघ 102 धावांवर सर्वबाद झाला. टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर भारतीय संघ हरारे स्पोर्टर्स क्लबमध्ये पहिली मॅच खेळत होता. मुझरबनी आणि चटारानं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताला 13 धावांनी पराभूत केलं. वॉशिंग्टनं सुंदरनं 27 धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. झिम्बॉब्वे विरुद्ध शुभमन गिल आणि वॉशिंग्टनं सुंदर शिवाय इतर फलंदाज चांगली खेळी करण्यात अपयश आलं.


पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?


आम्ही चांगली गोलंदाजी केली होती. पण आम्ही या सामन्यात नव्हतो असं दिसलं, हे अत्यंत लाजीरवाणं आहे. आम्ही दर्जेदार क्रिकेट खेळलो नाही. प्रत्येक जण विचलीत झालेला दिसला. आम्ही खेळपट्टीवर वेळ काढण्याबाबत आणि फलंदाजीचा आनंद घेण्याबद्दल बोललो पण तसं काही झालं नाही. अर्धा टप्प्यात आम्ही 5 विकेट गमवल्या. मी शेवटपर्यंत राहिलो असतो तर ते चांगलं राहिलं असतं. मी बाद झाल्यानंतर सामना संपुष्टात आला. त्यामुळे खूप निराश झालो. आमच्यासाठी विजयाची आशा होती. पण 115 धावांचा पाठलाग करता दहाव्या क्रमांकाचा फलंदाज उतरतो म्हणजे काहीतरी चुकतंय, असं शुभमन गिलने सांगितले.




सामना कसा राहिला?


झिम्बाब्वेने भारतापुढे 116 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. अभिषेक शर्माला खातंही उघडता आलं नाही, तो शून्यावर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराज गायकवाड देखील झटपट बाद झाला. ऋतुराज गायकवाडने 7 धावा केल्या. भारतीय संघाकडून पदार्पण करणाऱ्या रियान परागलाही मोठी खेळी करण्यात अपयश आले. रियान परागने फक्त 2 धावा केल्या. रिंकु सिंह देखील शून्यावर बाद झाला. कर्णधार शुभमन गिल आणि ध्रुव जुरेलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही अपयश आले. शुभमन गिल 31 धावा करत बाद झाला, तर ध्रुव जुरेलने 6 धावा केल्या. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिंकदर राजाने 3 विकेट् घेतल्या. 


झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ:


शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा


India vs Zimbabwe मालिकेतील पुढील सामने-


दुसरी टी-20 - 7 जुलै, हरारे
तिसरी टी-20 - 10 जुलै, हरारे
चौथी टी-20 - 13 जुलै, हरारे
पाचवी टी-20- 14 जुलै, हरारे


संबंधित बातमी:


Ind vs Zim T20: 'अहंकाराला पायबंद बसला...'; टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शशी थरुर यांचं ट्विट