India vs West Indies 1st Test Day 2 Highlights : डोमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल दोघांनी शतके झळकावली आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने दोन बाद 312 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 143 आणि विराट कोहली 36 धावांवर खेळत आहेत. भारताकडे 162 धावांची आघाडी आहे. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांच्यामध्ये नाबाद 72 धावांची भागिदारी झाली आहे. डोमिनिका कसोटीवर भारताची भक्कम पकड झाली आहे.
यशस्वी जायस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 229 धावांची भागिदारी करत भारताला मजबूत सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यापुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज फिके वाटत होते. ही जोडी फोडण्यासाठी वेस्ट इंडिजने नऊ गोलंदाजांचा वापर केला. शतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने 221 चेंडूत 103 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये रोहित शर्माने दोन षटकार आणि 10 चौकार लगावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही लगेच तंबूत परतला. शुभमन गिल याला फक्त सहा धावांचे योगदान देता आले. शुभमन गिल बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत यशस्वी जयस्वाल याला साथ दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल 350 चेंडूत 143 धावांवर खेळत आहे. तर विराट कोहली 96 चेंडूत 36 धावावर खेळत आहे. भारताकडे 162 धावांची आघाडी आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी तुफानी केली आहे. यशस्वी जायस्वाल याने पदार्पणातच शतक झळकावत आपली प्रतिभा दाखवून दिली. पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय संघाकडे सध्या 162 धावांची आघाडी झाली आहे. भारतीय फलंदाजापुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज हतबल झाले. एकाही गोलंदाजाचा मारा प्रभावी वाटला नाही.
पदार्पणात शतकी तडाखा -
युवा यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल 143 धावांवर खेळत आहे. या खेळीत यशस्वीने 14 चौकार लगावले आहेत. पदार्पणात विदेशात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल दहावा भारतीय फलंदाज झालाय. त्याशिवाय पदार्पणातच सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही यशस्वी जयस्वालने केला आहे. पदार्पणात विदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वी जयस्वाल याने केला आहे, याआधी असा पराक्रम कुणालाही करता आला नाही.
पदार्पणात कुणी कुणी शतक ठोकले -
यशस्वी जयस्वाल 2023, वेस्ट इंडिज - विदेशात
श्रेयस अय्यर 2021, न्यूझीलंड, मायदेशात
पृथ्वी शॉ 2018, वेस्ट इंडिज - मायदेशात
रोहित शर्मा 2013, वेस्ट इंडिज, मायदेशात
शिखर धवन 2013, ऑस्ट्रेलिया, मायदेशात
सुरेश रैना 2010, श्रीलंका, विदेशात
विरेंद्र सेहवाग 2001, दक्षिण आफ्रिका, विदेशात
सौरव गांगुली 1996, इंग्लंड, विदेशात
प्रविण आमरे 1992, दक्षिण आफ्रिका विदेशात
मोहम्मद अझरुद्दीन 1984, इंग्लंड, मायदेशात
रोहित शर्माच्या नावावर विक्रम -
रोहित शर्माने कसोटीत मोठा विक्रम नावावर केला आहे. कसोटीमध्ये सलामीला रोहित शर्माने 39 डावात सात शतके आणि चार अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केलाय. त्याशिवाय कसोटीमध्ये रोहित शर्माने 3500 धावांचा पल्ला पार केला आहे. रोहित शर्माने 46 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. 2019 मध्ये रोहित शर्मा कसोटीत सलामीला उतरला अन् तेव्हापासून त्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. सलामीला फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त धावा काढण्यात रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
कोहलीने विरेंद्र सेहवागला टाकले मागे
माजी कर्णधार विराट कोहलीने आठ हजार 500 धावांचा पल्ला पार केला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्य स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीने 110 व्या सामन्यात 8500 धावांचा पल्ला पार केला आहे. विराट कोहलीने विरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. विराट कोहलीच्या पुढे आता लक्ष्मण, गावस्कर, द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज आहेत.