India vs Sri Lanka 3rd ODI India Playing XI: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज (07 ऑगस्ट) खेळवला जाणार आहे. दुपारी 2.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. श्रीलंका मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे, तर श्रीलंकेला विजय मिळवून मालिका जिंकायची आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक-दोन नव्हे तर तीन बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


श्रीलंकेविरुद्ध 27 वर्षांनंतर पहिल्यांदा मालिका गमविण्याचे संकट भारतीय संघापुढे उभे ठाकले आहे. मालिकेतील आत्तापर्यंतच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये ऋषभ पंतएवजी यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला प्राधान्य देण्यात आले. मात्र, आता या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळू शकते कारण केएल राहुलने दोन्ही सामन्यांमध्ये फारशी कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यात राहुलने 31 धावांची खेळी केली होती. यानंतर दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झला. 


रियान पराग पदार्पण करणार?


भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय खेळलेला रियान पराग आज श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो. रियान परागचा संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश केला जाऊ शकतो. शिवम दुबेच्या जागी रियान परागला संधी मिळू शकते. शिवम दुबेने मालिकेतील दोन्ही सामने खेळले, ज्यात त्याने फारशी चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या सामन्यात दुबेने 25 धावांची खेळी केली आणि 1 विकेट घेतली. तर दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला.


गोलंदाजीतही बदल होणार-


तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या गोलंदाजी विभागात देखील बदल होण्याची शक्यता आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या जागी खलील अहमदला संधी दिली जाऊ शकते. खलील आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. 


श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रायन पराग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, खलील अहमद.


रोहित शर्मा आतापर्यंत चांगल्या फॉर्ममध्ये-


भारत-श्रीलंका वनडे मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दोन्ही सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. टाय झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 47 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधाराने 58 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या.






संबंधित बातमी:


IND vs SL: रोहित-कोहलीची गरज होती का?; गौतम गंभीरच्या रणनीतीवर आशिष नेहराने उपस्थित केले प्रश्न