India vs Sri lanka : कोलंबोच्या प्रेमादास स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाला आहे. दरम्यान, पाऊस सुरु झाल्याने पंचांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने 23 षटकांत 3 गडी गमावून 147 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव नाबाद 22 तर मनीष पांडे 10 धावांवर नाबाद खेळत आहेत.


तत्पूर्वी, टीम इंडियाने तिसर्‍या आणि शेवटच्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात पाच खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. संजू, नितीश, गौतम, सकरिया आणि राहुल यांना डेब्यू कॅप देण्यात आली आहे. दरम्यान पावसामुळे आता सामना थांबला आहे.




भारत तिसरा सामनाही जिंकण्याच्या तयारीत
श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून टीम इंडियाने विजयी आघाडी घेतली आहे. आता आजचा तिसरा आणि अंतिम सामना जिंकून श्रीलंकेचा सुपडा साफ करण्याच्या उद्देशानं टीम इंडिया मैदानात उतरला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सामना सात गडी राखून जिंकला. या सामन्यात शिखर धवनसह पृथ्वी शॉ, ईशान किशननं शानदार खेळी केली. दुसऱ्या सामन्यात दीपक चहरच्या नाबाद 69 धावांच्या खेळीमुळे पराभवाच्या दिशेनं चाललेल्या टीम इंडियाला विजय मिळाला. त्यामुळे तिसराही सामनाही जिंकण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे.