India Vs Sri Lanka 2nd T20I: वानखेडे मैदानावर झालेल्या  पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव केला होता. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना उद्या पुण्यातील मैदानात होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील टीम इंडियानं पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता. आता पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेवर कब्जा मिळवण्याची संधी आहे. पण प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण, संजू सॅमसनला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्लेईंग 11 मध्ये हार्दिक पांड्याला बदल करावा लागू शकतो. 
 
पदार्पण कराणाऱ्या शिवम मावीने पहिल्याच सामन्यात भेदक मारा केला. मावीने अवघ्या 22 धावांच्या मोबदल्यात चार विकेट घेतल्या. दुसऱ्या सामन्यात सर्वांची नजर शिवम मावीच्या गोलंदाजीकडे असणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, गोलंदाजीत भारतीय संघ बदल होण्याची शक्यता कमीच आहे. अर्शदीप सिंह तंदुरुस्त झाल्यास हर्षल पटेलच्या जागेवर त्याला संधी मिळू शकते, अन्यथा गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे. 


पहिल्या सामन्यात भारताची आघाडीची फळी कोलमडली होती. अखेरच्या षटकात दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी फलंदाजी करत सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. दुसऱ्या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांना धावा जमवाव्या लागणार आहेत. दरम्यान, संजू सॅमसनच्या जागेवर राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


पहिल्या सामन्यात काय झालं?
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात दोन धावांनी थरारक विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेला अखेरच्या चेंडूवर चार धावा हव्या होत्या. त्यावेळी दिलशान मदुशंका रनआऊट झाला आणि हा थरारक सामना भारताने दोन धावांनी जिंकला. शिवम मावीने चार विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये पाच बाद १६२ धावा केल्या. दीपक हुडाने २३ चेंडूंमध्ये नाबाद ४१ तर अक्षर पटेलने २० चेंडूंमध्ये नाबाद ३१ धावांची खेळी केली. श्रीलंकेला २० षटकांमध्ये १६० धावांची मजल मारता आली.


कशी असू शकते प्लेईंग 11 - 
भारतीय संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी,  युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी.