India vs South Africa playing 11 3rd T20I : कटक आणि चंदीगडनंतर भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचा थरार आता धर्मशालाला पोहोचला आहे. जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमपैकी एक मानल्या जाणाऱ्या HPCA स्टेडियमवर तब्बल 10 वर्षांनंतर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी असल्याने रविवार 14 डिसेंबर रोजी होणारा तिसरा टी-20 सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
धर्मशालात टीम इंडियाची कसोटी
दुसऱ्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाकडून जोरदार पुनरागमनाची अपेक्षा आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या सामन्यात 101 धावांनी मोठा विजय मिळवला होता, मात्र दुसऱ्या लढतीत 51 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात दमदार खेळ आवश्यक आहे. मात्र संघासमोर काही मोठ्या अडचणी उभ्या आहेत.
शुभमन गिल बाहेर होणार का?
भारतीय संघाची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे टॉप ऑर्डरची फलंदाजी. मालिकेतील दोन्ही सामन्यांत अव्वल फळी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. अभिषेक शर्मा अपेक्षेप्रमाणे खेळताना दिसलेला नाहीतच, पण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिलच्या फॉर्मनेही चिंता वाढवली आहे. या वर्षी दोघांनाही एकही अर्धशतक करता आलेले नाही. या मालिकेत सूर्या फक्त 17, तर गिल केवळ 4 धावा करू शकला आहे.
कर्णधाराला संघाबाहेर काढणे शक्य नाही, पण गिलला विश्रांती दिली जाईल का, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का, यावर चर्चा रंगली आहे. मात्र प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचा पाठिंबा लक्षात घेता, गिलला किमान आणखी एक संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे धर्मशालातील सामना गिलसाठी ‘करो या मरो’ ठरू शकतो.
गोलंदाजीत बदल?
गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंगचा मागील सामन्यातील कामगिरी निराशाजनक ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याची आणि जसप्रीत बुमराहची चांगलीच धुलाई केली, मात्र नियंत्रणाच्या बाबतीत अर्शदीप पूर्णपणे अपयशी ठरला. एका षटकात सलग 5 वाइडसह एकूण 7 वाइड टाकत त्याने सामन्यात एकूण 9 वाइड टाकत आणि 4 षटकात 54 धावा दिल्या. त्यामुळे त्याला या सामन्यासाठी संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला संधी मिळू शकते.
10 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला?
HPCA स्टेडियमवर भारताने आतापर्यंत 3 टी-20 सामने खेळले असून त्यापैकी 2 सामने जिंकले आहेत, तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे हा एकमेव पराभव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच आला होता. ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या त्या पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेट्सने पराभव केला होता. आता तब्बल 10 वर्षांनंतर टीम इंडिया त्याच मैदानावर जुनं देणं फेडण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाची संभाव्य Playing XI -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा -