India vs Pakistan Asia Cup 2023 : कोलंबो येथे सुरु असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. कोलंबोमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना प्रभावित झाला आहे. भारताच्या फलंदाजीवेळी 24.1 षटकानंतर पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला.  भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली होती. पण पावसाने व्यत्यय घातला आहे. मागील अर्धा तासांपासून सामना थांबलाय. खेळपट्टी आणि आजूबाजूचा परिसर कव्हर्सने झाकण्यात आला आहे. पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने दोन विकेटच्या मोबदल्यात 24.1 षटकात 147 धावा फलकावर लावल्या होत्या. 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा पावसाने खोडा घातला आहे. आशिया चषकातील साखळी सामन्यातही पावसाने व्यत्यय घातल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करावा लागला होता. आता पावसाने उंसत घेतल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पावसासंदर्भातील ट्वीट केलेय. त्याशिवाय सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 






पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. 






भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस 


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना वगळता आशिया चषक 2023 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यालाही राखीव दिवस नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे आशिया चषक स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, अंतिम सामना आणि सुपर-4 फेरीतील भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. हे दोन्ही सामने जेव्हा सुरू होतील, त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सामना छोटा झाला, तरीही त्याच दिवशी संपवला जाईल. असे असूनही सामना पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी जिथे सामना रोखण्यात आला होता, तिथूनच सुरू केला जाईल.