IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: कोलंबोतील महामुकाबल्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. पाकिस्तानचा कर्णधार  बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करायची होती, असे रोहित शर्माने सांगितले. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. 




पाकिस्तानविरोधातील महामुकाबल्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना टीम इंडियात स्थान मिळाले आहे. मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकणार आहे. तर बुमराहच्या कमबॅकमुळे मोहम्मद शामी याला बाहेर बसावे लागणार आहे. 




भारताचे 11 शिलेदार कोणते?


शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


पाकिस्तानच्या प्लेईंग 11 मध्ये कोण-कोण?



बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फकर झमान, एमाम-उल-हक, सलमान अली अघा, इफ्कीखर अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), फाहिम अशरफ, नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हरीस रौफ.


कुणाचे पारडे जड - 



भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की चाहत्याच्या नजरा सामन्याकडेच असतात. एक काळ असा होता की, भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी असा सामना असायचा... पण आता पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी आहे आणि भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी पाकिस्तानची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल.  जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज पाकिस्तानच्या गोलंदाजापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानची फलंदाजीही दमदार आहे.  बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा आणि इमाम उल हक शानदार फॉर्मात आहेत. इफ्तिखारही रंगात आहे. शनिवारी रोमांचक सामना होईल. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत. 



कोलंबोत विराटचा जलवा



कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडिअमवर विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. विराट कोहलीने या मैदानावर मागील तीन सामन्यात शतके झळकावली आहेत. या मैदानावर विराट कोहलीची सरासरी 100 पेक्षा जास्त आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


 


रोहित-विराट जोडीही करणार विक्रम



विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने आतापर्यंत 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये आतापर्यंत 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी झाल्या आहेत. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम होऊ शकतो.