India vs New Zealand World Cup Semi Final 2023: बाप का... दादा का... भाई का... सबका बदला लेगा ये तेरा फैजल... बॉलिवूडमधला हा फेमस डायलॉग, पण सध्या टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) अगदी व्यवस्थित लागू होत आहे. वर्ल्डकप 2023 (World Cup 2023) च्या सुरुवातीपासूनच टीम इंडिया (Team India) फॉर्मात आहे. आतापर्यंत टीम इंडियानं वर्ल्डकप 2023 (ICC World Cup 2023) मध्ये एकही सामना गमावलेला नाही. सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियानं दणक्यात सेमीफायनल्समध्ये (World Cup Semi Final) एन्ट्री घेतली आहे. आता सेमीफायनलमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात टक्कर होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियाची सेमीफायनलची लढत जवळपास ठरली आणि सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात काही कटू आठवणी जाग्या झाल्या. 2019 मध्ये धोनी रनआऊट झाल्याच्या कटू आठवणी सर्वांच्या मनात जाग्या झाल्यात. 2019 च्या मॅनचेस्टरमधील विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडन हरवलं होतं. 


आतापर्यंत धमाकेदार खेळी करत टीम इंडियानं सेमीफायनल गाठल्यामुळे चाहते भलतेच खूश आहेत. अशातच सेमीफायनलचा सामना न्यूझीलंडसोबत रंगणार असल्याचं ऐकून चाहत्यांच्या मनात जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात, 'धोनीचा, 2019 चा, मैनचेस्टरचा, सर्वांचा बदला आमचा रोहित घेणार' हेच वाक्य सारखं सारखं फिरतंय. 


यंदा भारतीय क्रिकेट संघ गेल्या विश्वचषकापेक्षा खूपच मजबूत स्थितीत आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी पूर्ण फॉर्ममध्ये आहे. कर्णधार रोहित, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे फलंदाजीत दमदार फॉर्मात आहेत. अष्टपैलू रवींद्र जाडेजाही बॉल आणि बॅटनं आपली जादू दाखवत आहे. भारतीय क्रिकेट संघानं ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. आता पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडचा धुव्वा उडवण्यासाठी सज्ज आहे. 


दुसरीकडे, वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह फॉर्मात आहेत. याशिवाय स्पिनर कुलदीप यादव आणि जाडेजाची उत्तम साथही मिळत आहेच. अशा स्थितीत न्यूझीलंडला यावेळी अत्यंत सावध राहावं लागणार आहे.


ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियानं 48 षटकांत 6 गडी गमावून 274 धावांचं लक्ष्य गाठलं. हा सामना धर्मशाला येथे खेळवण्यात आला. तर भारतीय क्रिकेट संघाला 15 नोव्हेंबरला दिवाळीनंतर उपांत्य फेरीचा सामना खेळायचा आहे.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमीफायनलचा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, वानखेडे रोहितचं होम ग्राउंड आहे. याच विश्वचषकात टीम इंडियानं वानखेडेवरच श्रीलंकेला 55 धावांत गुंडाळून 302 धावांनी पराभूत केलं होतं. अशा परिस्थितीत रोहितला दिवाळीनंतर शत्रूला पराभूत करण्याची मोठी संधी असेल. 


विश्वचषकातील सेमीफायनल्सचं समीकरण 


पहिली सेमीफायनल टीम इंडिया Vs न्यूजीलंड (जर पाकिस्ताननं कोणताच चमत्कार केला नाही तरच) - मुंबई (वानखेडे स्टेडियम) - 15 नोव्हेंबर 
दूसरी सेमीफायनल दक्षिण आफ्रीका Vs ऑस्ट्रेलिया - कोलकाता (ईडन गार्डन्स) - 16 नोव्हेंबर 


वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया आणि न्यूजीलंडचा स्क्वॉड


टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्रन अश्विन आणि शार्दुल ठाकुर. 


न्यूजीलंड टीम: केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेवोन कॉन्वे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, टॉम लॅथम (उपकर्णधार/विकेटकीपर), डेरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, ईश सोढी, टिम साउदी आणि विल यंग.