India v New Zealand : विश्वचषकातील अपयश मागे टाकत आजपासून भारतीय संघ मैदानावर उतरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. साखळी फेरीत भारतीय संघाचं आवाहन संपुष्टात आलं होतं. ही कामगिरी विसरुन आजपासून भारतीय संघ आपल्या नव्या अभियानाला सुरुवात करणार आहे. जयपूरमध्ये होणाऱ्या टी-20 सामन्यापासून रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीच्या पर्वाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाआधी विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यातच रवी शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळही संपला होता. त्यामुळे टी-20 मध्ये कर्णधार-प्रशिक्षकाची नवी जोडी आजपासून मैदानात उतरणार आहे. जयपूरमध्ये भारतीय संघ वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. मात्र, संघनिवड करताना रोहित-राहुल यांची डोकेदुखी वाढणार आहे.


पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टी-20 स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे भारताविरोधात न्यूझीलंड संघाचं नेतृत्व वेगवान गोलंदाज टिम साऊदी करणार आहे. डेवॉन कॉन्वेसुद्धा दुखापतीमुळे मुकणार असल्याने डॅरेल मिचेल, मार्टिन गप्टिल यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. लॉकी फर्गुसन यानं दुखापतीनंतर पुनरागमन केल्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे.


अनुभवी फलंदाजांच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. विराट कोहली, शिखर धवन, शामी, बुमराह यांना आराम देण्यात आलाय. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. रोहित-राहुलपुढे सलामीच्या जोडीचा पेच असणार आहे. रोहित-राहुल सलामीला उतरणार का? की राहुल मधल्या फळीत फलंदजी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहितच्या साथीने महाराष्ट्राचा ऋतुराज सलामीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हार्दिक पांड्याच्या पर्यायाचा शोधही घेतला जातोय. त्यामुळे वेंकटेश अय्यरला संधी देण्यात आली आहे.  


सामन्यावर प्रदुषणाचे सावट-
जयपूर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे. जयपूरमधील प्रदूषणाची पातळी गेल्या आठवडय़ाभरात वाढली असल्याने पहिल्या लढतीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांतील हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याने जयपूरलासुद्धा त्याचा फटका बसत आहे. तसेच तेथील अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत असल्याचेही समजते. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 337 पर्यंत घसरला आहे. दिवाळीदरम्यान हा निर्देशांक 364 इतका होता. भारतातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे जयपूरमधील टी-20 सामन्यावर परश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक :
टी-20 विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारतात टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी आलाय.  17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी20 मालिका होणार आहे. 17 तारखेला जयपूरमध्ये पहिला टी-20 सामना होणार आहे. 19 तारखेला रांचीमध्ये दुसरा तर कोलकातामध्ये तिसरा टी-20 सामना होणार आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे.  


भारताचा टी20 संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव , ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज