IND vs ENG: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपला आहे. ऋषभ पंत 58 धावांवर नाबाद राहिला असून इंग्लंडच्या मोईन अलीने चार विकेट्स घेतल्या आहेत. शेवटची माहिती येईपर्यंत इंग्लंडच्या सात धावा झाल्या असून इशांत शर्माने इंग्लडची पहिली विकेट घेतली आहे.


काल पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या सहा विकेटच्या बदल्यात 300 धावा झाल्या होत्या. रोहित शर्माने 161 धावांची शानदार खेळी खेळली. त्यामुळे भारत भक्कम स्थितीत पोहचला होता.


रोहितने 231 चेंडूत 161 धावा केल्या. या दरम्यान त्याने आपल्या फलंदाजीत 18 चौकार आणि दोन षटकार लगावले. दुसरीकडे रहाणेने 149 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. या दोघांनी दुसर्‍या सत्रामध्ये भारताला कोणताही धक्का बसू दिला नाही.


आज दुसऱ्या दिवशी भारताने आपला डाव 300 धावांवरुन सुरु केला. कालच्या धावसंख्येत भारताच्या उर्वरित खेळाडूंनी केवळ 29 धावांची भर घातली, ऋषभ पंत 58 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या वतीनं मोईन अलीने चार विकेट्स घेतल्या. त्या व्यतिरिक्त जॅक लीचने दोन तर ओली स्टोन आणि जो रूट यांना प्रत्येकी एक गडी बाद केला.