india vs australia 3rd test भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही क्रिकेट संघांत सुरु असणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णभेदी टीकांचा सामना करावा लागला होता. काही खेळाडूंनी भारतीय खेळाडूविरूद्ध केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणी बाबतीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माफी मागितली. याप्रकरणी कारवाई करत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं 6 प्रेक्षकांना मैदानाबाहेर पाठवत त्यांची चौकशीही करण्यात आल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर आता यावर संपूर्ण क्रीडा विश्वातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये 'मास्टर ब्लास्टर' (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं.
सचिनं ट्विट करत सदर प्रकरणी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 'खेळात सर्वांना एकत्र आणलं जातं, विभक्त केलं जात नाही. क्रिकेटमध्ये कधीही भेदभाव शिकवला जात नाही. बॅट आणि बॉल हाती घेणाऱ्या खेळाडूच्या कौशल्याला इथं महत्त्वं असतं. याचा धर्म, जात, आणि राष्ट्रीयत्वाशी काहीही संबंध नाही, ज्यांना ही बाब कळत नाही, त्यांना या खेळात स्थान नाही', असं स्पष्ट मत सचिननं मांडलं.
मैदानात नेमकं काय घडलं?
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला चहापानाच्या ठीक अगोदर सीमारेषेपाशी लाइनवर वर्णद्वेषी टीका सहन करावी लागली. या प्रकरणाची माहिती सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेला दिली. त्यानंतर रहाणेने तातडीने पंचांकडे याबाबच तक्रार केली. या घटनेनंतर चहापानाच्या वेळेपूर्वी या संपूर्ण प्रकारामुळे खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला होता.
IND vs AUS: 'हे खपवून घेतले जाणार नाही'.. वर्णद्वेषी टिप्पणीवरुन कर्णधार विराट कोहली भडकला
दरम्यान, मैदानात घडलेल्या या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाकडूनही या घटनेचा तपास करण्यात येणार आहे. भारतीय खेळाडूंना वर्षद्वेषाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावर सध्या क्रिकेट वर्तुळासोबतच क्रीडा रसिकांनीही तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.