Ind vs Aus, 1st ODI : भारताने बॉर्डर गावस्कर मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. त्यानंतर आता तीन सामन्याची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. पण पहिल्या सामन्याला भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा मुकणार आहे. मेहुण्याच्या लग्नामुळे रोहित शर्माने पहिल्या सामन्यापासून ब्रेक घेतला आहे. त्याजागी आता हार्दिक पांड्या संघाचं नेतृत्व करणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व सांभाळणार आहे. 


रोहित शर्माचा मेहुणा कुणाल सजदेह याच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. रोहित शर्मा आणि रितिका लग्नातील विधीसाठी पोहचले आहेत. लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. कुणालच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रोहित शर्मा आणि रितिकाचा लग्नातील लूक  अनेकांचं लक्ष वेधणारा आहे. मेहुण्याच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी रोहित शर्माने क्रिकेटपासून  थोडावेळ ब्रेक घेतला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. दुसऱ्या वनडेपासून रोहित शर्मा टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. 17 मार्च 2023 पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. 








वनडे मालिकेसाठी कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.


कसे आहे वेळापत्रक ?-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.  मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. वनडे मालिकेतील दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणार आहे. तिसरा सामना 22 मार्च रोजी चेन्नईत खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होतील.


पहिल्या वनडेची मदार पांड्याच्या खांद्यावर 
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा अनुपस्थित राहणार आहे. कौटुंबिक कारणांमुळे तो या सामन्याचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या टीम इंडियाची मदार सांभाळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करण्याची हार्दिकची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी त्याने T20 मध्ये कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याने 11 पैकी 8 टी-20 मध्ये टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे.