IND vs AUS Venues, Timing And Schedule : विश्वचषकाआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका होणार आहे.  मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीत होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे शिलेदार भारतात दाखल झाले आहेत. मोहालीमध्ये कांगारुंनी सरावही केला. 


डेविड वॉर्नर काय म्हणाला 


विश्वचषक आणि वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात दाखल झालाय. सलामी फलंदाज डेविड वॉर्नर याने सोशल मीडियावर भारतात पोहचल्यानंतर पोस्ट केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, पुन्हा एकदा भारतात येऊन बरे वाटत आहे. आम्ही भारतात खूप सुरक्षित आहोत, यासाठी  आभार...  


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक -


आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.  पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे. 


सामन्याची वेळ काय ?


भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळले जातील. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते.


कुठे पाहाल सामना -


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमावर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.


पहिल्या दोन वनडेसाठी टीम इंडिया - 


केएल राहुल (कर्णधार, विकेकटकीपर), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा


भारताविरोधात वनडे मालिकेसाठी  ऑस्ट्रेलियाची टीम:


पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा. 


ऑस्ट्रेलियाचे पारडे जड -


वनडेमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियान संघाचा कायम वरचष्मा राहिला आहे. आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकदिवसीय प्रकारात 146 वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने 82 सामन्यांत भारताचा पराभव केला आहे. तर भारतीय संघाला केवळ 54 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय भारत आणि ऑस्ट्रेलिया भारतीय भूमीवर ६७ वेळा आमनेसामने आले आहेत. ऑस्ट्रेलियाने भारतीय भूमीवर टीम इंडियाचा 32 वेळा पराभव केला आहे. तर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 30 वेळा पराभव केला आहे. 


भारत-ऑस्ट्रेलिया विश्वचषकात कधी भिडणार -  


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेनंतर विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.  भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ८ ऑक्टोबरला होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान, नुकतेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आशिया चषकाचे विजेतेपद पटकावलेय. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 वनडे मालिकेत 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला होता.