India vs Australia 1st Test: भारतीय संघाने दुसऱ्या डावात जबरदस्त फलंदाजी करत यजमान ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयासाठी 534 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अतिशय खराब झाली. काल दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स गमावत 12 धावा केल्या होत्या. आज कसोटी सामन्यातील चौथा दिवस असून सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 23/4 अशी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होताच मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला.
यशस्वी जैस्वाल-विराट कोहलीचे ऑस्ट्रेलियामध्ये कौतुक-
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात अनेक चांगले क्षण समोर आले. यामध्ये भारताकडून यशस्वी जैस्वालने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिले शतक झळकावले. तर विराट कोहलीने देखील आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 81 वे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघासह यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीचे खूप कौतुक होत आहे. यशस्वी जैस्वालने 297 चेंडूत 161 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 143 चेंडूत 100 धावा केल्या.
विराट कोहलीचे गौतम गंभीरला मिठी- ( Gautam Gambhir hugging Virat Kohli Video )
विराट कोहलीने शतक झळकल्यानंतर मैदानात उभे राहून सामना पाहायला उपस्थित राहिलेल्या पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग किस दिली. त्यानंतर अनुष्काने देखील उभे राहून विराट कोहलीचे कौतुक केले. या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचदरम्यान विराट कोहली शतक झळकावून जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये गेला. त्यावेळी विराट कोहलीने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला मिठी मारली. यावेळी व्हिडीओ देखील समोर आला आहे.
ऑस्ट्रेलियात विराटचा विक्रम-
या कसोटी सामन्यापूर्वी कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर सहा शतके झळकावली होती. 13 सामन्यात 54.08 च्या सरासरीने 1352 धावा केल्या. यावरून त्यांचे वर्चस्व समजू शकते. यावेळी त्याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आणखी चांगली कामगिरी करायची आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने हे सिद्ध केले. त्याची नजर या मालिकेत भरघोस धावा करण्यावर आहे.