India U19 Beats Australia U19 1st Test : भारतीय अंडर-19 संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. जेथे भारतीय अंडर-19 संघाने आधी ऑस्ट्रेलियन अंडर-19 संघाला वनडे मालिकेत 3-0 ने सुपडा साफ केला. आता पहिल्या यूथ कसोटीमध्ये भारतीय अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि 58 धावांनी पराभूत केले आहे. अशा प्रकारे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन अंडर-19 संघाविरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत. 

Continues below advertisement

पहिल्या यूथ कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी केली आणि फक्त 243 धावा केल्या. त्यानंतर भारताने 428 धावा करून 183 धावांची आघाडी घेतली, जी विजयासाठी निर्णायक ठरली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने केवळ 127 धावा केल्या. त्यामुळे भारताने दमदार विजय मिळवला.

दीपेश देवेंद्रनने घेतल्या पाच विकेट्स

Continues below advertisement

ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली, पण संघाची सुरुवात खुपच खराब झाली आणि फक्त 243 धावांवर आपला डाव संपवला. ऑस्ट्रेलियासाठी स्टीवन होगनने सर्वाधिक 92 धावा केल्या, तर जेड होलिकने 38 आणि कर्णधार विल मालाजचुकने 21 धावा केल्या. भारतीय संघासाठी दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. किशन कुमारने तीन बळी घेत संघाची कामगिरी अजून मजबूत केली.

वैभव सूर्यवंशी आणि वेदांत त्रिवेदी यांनी शतक ठोकले

भारतीय संघासाठी वैभव सूर्यवंशी आणि वेदांत त्रिवेदी यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. दोघांनी शतक केलं आणि संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली. वैभवने 86 चेंडूत 113 धावा ठोकल्या, ज्यात 9 चौकार आणि 8 षटकार होते. वेदांतने 192 चेंडूत 140 धावा केल्या, ज्यात 19 चौकार होते. खिलान पटेलनेही 49 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी हेडन शिलरने तीन बळी घेतले. फलंदाजांच्या या जोरदार कामगिरीमुळे भारताला 183 धावांनी आघाडी मिळाली, जी नंतर विजयासाठी महत्त्वाची ठरली.

पहिल्या कसोटीमध्ये कंगारूंना घरात घुसून झोडपलं

पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियन फलंदाज फ्लॉप ठरली. कर्णधार विल मालाजचुकने सर्वाधिक 22 धावा केल्या, पण इतर फलंदाज फारसा काही प्रभाव टाकू शकले नाहीत. भारतासाठी खिलान पटेलने 7 ओव्हरमध्ये तीन बळी घेत संघाला विजयाकडे नेले. दीपेश देवेंद्रन आणि अनमोलजीत सिंगने प्रत्येकी दोन बळी घेत संघाची पकड मजबूत केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघाने केवळ 50 धावांवर सहा बळी गमावले. अशा प्रकारे भारतीय अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जोरदार विजय मिळवून आपली चमक दाखवली आहे.

हे ही वाचा -

Ind vs Pak : ट्रॉफी घेऊन पळणाऱ्या मोहसीन नक्वीला शोएब अख्तरने सुनावलं, नको नको ते बोलला, सगळ्या मर्यादा ओलांडल्या!