Team India Unveils New Jersey with Apollo Tyres : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मात्र, या सामन्यापेक्षा जास्त चर्चेत आहे ती टीम इंडियाची नवी जर्सीची. यामागचं कारण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि अपोलो टायर्स यांच्यात तब्बल 579 कोटी रुपयांची डील झाली आहे.

अपोलो टायर्स... टीम इंडियाचा नवा जर्सी स्पॉन्सर

बीसीसीआयने ही डील स्वीकारताच भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा प्रत्येकाचं लक्ष खेळाडूंच्या छातीवर झळकणाऱ्या अपोलो टायर्सच्या लोगोवर केंद्रित झालं. याआधी ड्रीम-11 टीम इंडियाचा जर्सी स्पॉन्सर होता, पण देशात फँटेसी बेटिंग अ‍ॅप्सवर लावलेल्या बंदीनंतर ड्रीम-11 ने करारातून माघार घेतली. यानंतर अपोलो टायर्सने मार्च 2028 पर्यंतचा स्पॉन्सरचा करार बीसीसीआयने समोर मांडला आणि बोर्डाने तो तात्काळ स्वीकारला. त्यामुळे पुढील काही वर्षे भारतीय संघाच्या जर्सीवर अपोलो टायर्सचा लोगो दिसणार आहे, आणि तोच संघाची ओळख ठरेल.

दिग्गजांविना नवा अध्याय

ही कसोटी सामन्याची आणखी एक खास बाब म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्याविना टीम इंडिया भारतात पहिला कसोटी सामना खेळत आहे. या तिघांच्या निवृत्तीनंतर भारत आता एका नव्या युगाची सुरुवात करत आहे. अहमदाबाद टेस्टमध्ये अनेक तरुण खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

वेस्ट इंडीजने जिंकला टॉस अन्...

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजचा कर्णधार रोस्टन चेज याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करत असून त्यांनी सांगितले की, भारत दोन जलद गोलंदाज आणि तीन फिरकीपटूंनी सज्ज असलेल्या संतुलित संघासह मैदानात उतरला आहे. या सामन्यात नीतीश कुमार रेड्डीची संघात पुनरागमन झालं आहे. वेस्ट इंडीजनेसुद्धा दोन जलद आणि दोन फिरकी गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये स्थान दिलं आहे.

पाकिस्तानच्या जर्सीची किंमत किती?

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या जर्सीचा स्पॉन्सर सॉफ्ट ड्रिंक कंपनी पेप्सी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पेप्सी आणि पाकिस्तान क्रिकेट यांच्यात खास नातं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि पेप्सी यांच्यात सुमारे 48 कोटी रुपयांची करार असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही रक्कम अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, हे केवळ एका अहवालानुसार सांगितले गेले आहे. यावरून स्पष्ट होते की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट संघाच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये किती मोठा फरक आहे. भारताच्या संघाला मिळणाऱ्या प्रायोजक रकमेच्या तुलनेत ही रक्कम खूपच कमी आहे.