India vs Australia Playing 11 For 4th Test : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ही मालिका गेल्या महिन्यात सुरू झाली असून आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. भारतीय संघाने पहिला सामना जिंकला, पण दुसऱ्या सामन्यात त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, तर तिसरा सामना अनिर्णित राहिला. आता 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये चौथी कसोटी सुरू होणार आहे. या सामन्यासाठी चाहत्यांच्या मनात भारताच्या प्लेइंग 11 बाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण टीम इंडियाने तिन्ही सामन्यांमध्ये काही बदल केले आहेत. अशा स्थितीत चौथ्या कसोटीतही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


नितीश रेड्डींच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला मिळणार संधी


भारताने आतापर्यंत पर्थ, ॲडलेड आणि ब्रिस्बेन येथे खेळलेले तीनही कसोटी सामने केवळ एकाच फिरकीपटूसह खेळले असून नितीश रेड्डी हा दुसरा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसत आहे. पण, मेलबर्नमध्ये बदल दिसू शकतो. तिथे खूप उष्णता आहे आणि खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी कोरडी पडते. यासाठी फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. विशेषज्ञ वेगवान गोलंदाजांमुळे नितीशचा सध्याच्या मालिकेत फारसा वापर झालेला नाही. अशा परिस्थितीत भारत त्याला बाहेरचा रस्ता दाखवून वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्याचा विचार करू शकतो. सुंदरच्या आगमनाने रवींद्र जडेजाला फिरकी विभागात साथ मिळेल आणि तो फलंदाजीतही योगदान देऊ शकेल.


टीम इंडियाचे कॉम्बिनेशन 


गोलंदाजी विभागात बदलाची अपेक्षा आहे, पण भारताच्या फलंदाजीत बदलाची आशा फारशी कमी आहे. शुभमन गिल यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलसोबत पुन्हा एकदा टॉप ऑर्डरमध्ये खेळताना दिसतील. यानंतर विराट कोहली, ऋषभ पंत आणि स्वतः कर्णधार रोहित शर्मा दिसू शकतात. मात्र, रोहित 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करत राहणार की तो आपली स्थिती बदलणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग-11 : उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग-11 : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.