India vs West Indies : भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान वेस्ट इंडिजचा संघ प्रथम गोलंदाजी करणार आहे. पहिल्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने चार धावांनी मात दिली होती. आता दुसरा सामना जिंकून पाच सामन्याच्या मालिकेत 1-1 बरोबरी करण्याचा प्रयत्न हार्दिक पांड्या आणि टीमचा असेल. गयाना येथील स्टेडिअम गोलंदाजीसाठी पोषक असल्याचे म्हटले जातेय. येथील सामने लो स्कोरिंग होतात. 


कुलदीप यादव दुखापतग्रस्त - 
पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. कुलदीप यादव याच्या जागी रवि बिश्नोई याला स्थान देण्यात आले आहे. नेट्समध्ये सराव करताना कुलदीप यादव दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्याला उपलब्ध नाही. त्यामुळे रवि बिश्नोई याला संधी देण्यात आली आहे. 





भारताची प्लेईंग 11 -


शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई आणि मुकेश कुमार


वेस्ट इंडिजचे 11 शिलादार कोण?


काइल मेयर्स, ब्रेंडन किंग, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिम्रोन हेटमेयर, रोवमैन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसेन, अल्ज़ारी जोसेफ आणि ओबेड मैककॉय


टीम इंडिया कमबॅक करणार का?
पहिल्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने 150 धावांचे आव्हान दिले होते. विडिंजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 20 षटकात विडिंजने सहा विकेटच्या मोबदल्यात 149 धावा केल्या होत्या. 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने 9 विकेटच्या मोबदल्यात 145 धावांपर्यंत मजल मारली होती. पहिला सामना चार धावांनी जिंकून विडिंजने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून टीम इंडिया कमबॅक करणार का ? की वेस्ट इंडिज मालिकेतील आघाडी अधिक भक्कम करणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. 


टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 
 


टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 26 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 8  सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे.