Australia vs India, 4th T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या रोमांचक टी-20 मालिकेतील चौथा सामना क्वीन्सलँडच्या कॅरारा ओव्हल मैदानावर खेळवला गेला. ज्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 8 गडी गमावून 167 धावा केल्या. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलिया संघाने चांगली सुरुवात करूनही 18.2 षटकांत सर्व गडी गमावून फक्त 119 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्शने 24 चेंडूत 30 धावांची खेळी केली. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट घेतल्या, तर अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
वादळी सुरुवात नंतर मिडिल ऑर्डर फेल!
चौथ्या टी20 सामन्यात नाणेफेक ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेली आणि कर्णधार मिचेल मार्शने प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रण दिलं. भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीची जबाबदारी सांभाळली. सामन्याच्या पहिल्याच षटकात बेन ड्वार्शुइसच्या चेंडूवर जेव्हियर बार्टलेटने अभिषेकचा झेल सोडला. मात्र त्यानंतर सातव्या षटकात अॅडम झम्पाने त्याला बाद केले. अभिषेकने 26 धावांची खेळी केली. 10 षटकांच्या खेळीनंतर भारताचा स्कोअर 75 धावा एक बाद असा होता.
जेव्हा बाराव्या षटकात शिवम दुबे 22 धावा करून बाद झाला, तेव्हा भारताला दुसरा धक्का बसला. दुबेनं आपल्या खेळीत एक चौकार आणि एक षटकार लगावला. तर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून 10 चेंडूंवर 20 धावा आल्या. मात्र त्यानंतर भारतीय संघाचे 4 गडी केवळ 15 धावांच्या अंतराने गमावले. अखेरच्या षटकात अष्टपैलू अक्षर पटेलनं जबरदस्त फलंदाजी करत संघाला सावरण्याचं काम केलं. मार्कस स्टॉइनिसच्या पहिल्याच चेंडूवर चौकार आणि पुढच्या चेंडूवर षटकार ठोकत त्यानं 11 चेंडूंमध्ये 21 झटपट धावा केल्या.
शुभमन गिलने केल्या सर्वाधिक धावा
टीम इंडियाकडून उपकर्णधार शुभमन गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सलामीवीर गिलनं 39 चेंडूंमध्ये 46 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. 118 च्या स्ट्राईक रेटने खेळत त्यानं कांगारू गोलंदाजांची चांगली धुलाई केली. तो अर्धशतक पूर्ण करण्यापासून केवळ 4 धावांनी दूर राहिला. नाथन एलिसनं त्याला माघारी पाठवलं. भारतानं 20 षटकांत 8 गडी गमावून 167 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाची धमाकेदार सुरुवात, पण शेवट खराब
168 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात मॅथ्यू शॉर्ट आणि मिचेल मार्श यांनी केली. दोघांनीही दमदार सुरुवात करून संघाला चांगली सुरूवात मिळवून दिली. मात्र, पाचव्या षटकात अक्षर पटेलने शॉर्टला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. शॉर्टने 25 धावा केल्या. तर नवव्या षटकात अक्षरने पुन्हा एकदा धक्का दिला आणि इंग्लिशला माघारी पाठवले. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 67 धावा होता.
मग शिवम दुबेने महत्वाच्या दोन विकेट घेतल्या, आधी कर्णधार मिचेल मार्श आऊट केले. मार्श 30 धावा करून बाद झाला. मग बाराव्या षटकात दुबेने टिम डेव्हिडलाही बाद केले. टिम डेव्हिड फक्त 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर चौदाव्या षटकात अर्शदीप सिंगने फिलिपचा विकेट घेतला, आणि त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 98 धावा होता. 15 व्या षटकात वरुणने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला आणि मॅक्सवेलला बाद केले. त्यानंतर सुंदरने स्टोइनिसला आणि पुढच्याच चेंडूवर त्याने बार्टलेटलाही बाद केले, यासोबत सुंदरने शेवटचीही विकेट घेतली.
हे ही वाचा -