Shubhman Gill : डोमिनिका येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला. भारताने एक डाव आणि 141 धावांनी विडिंजवर विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. 20 जुलैपासून वेस्ट इंडिज आणि टीम इंडिया यांच्यामध्ये दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना होणार आहे. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दोन्ही संघ आमने-सामने असतील. अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी तयारी सुरु केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शुभमन गिल फक्त सहा धावा काढून माघारी परतला. चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थित गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला होता. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. गिल अपयशी ठरण्याची ही पहिली वेळ नाही. मागील आठ डावात गिल याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अहमदाबाद कसोटी सामना वगळला तर सात डावात त्याला फक्त 90 धावांची खेळी करता आली आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 21 इतकी राहिली आहे. अहमदाबाद कसोटीमध्ये गिल याने 128 धावांची खेळी केली होती. पण हा अपवाद वगळता मागील आठ डावात तो अपयशी ठरलाय. 


कसोटी आणि टी 20 मध्ये धावांचा पाऊस पाडणारा शुभमन गिल कसोटीत फ्लॉप जात असल्याचे समोर आलेय. शुभमन गिल याने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत 17 कसोटी सामन्यात 31.96 च्या सरासरीने त्याने 927 धावा केल्या आहेत. 2 शतक आणि चार अर्धशतकाचा समावेश आहे. पहिले शतक बांगलादेशविरोधात तर दुसरे शतक ऑस्ट्रेलियाविरोधात झळकावली आहेत. 


आशियाबाहेर फ्लॉप - 


2023 मध्ये शुभमन गिल याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. पण आशियाबाहेर कसोटीमध्ये गिल याची बॅट शांतच असल्याचे दिसतेय. आशियाबाहेर झालेल्या कसोटीमध्ये सहा डावात खराब रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. सात कसोटी सामन्यात त्याला फक्त दोन अर्धशतक झळकावली आहेत. आशिया खंडाबाहेर मागील सहा डावात शुभमन गिल याला 30 धावसंख्याही ओलांडता आली नाही. 6, 18, 13, 4 17, 8 आणि 28 धावांची खेळी केली. त्यामुळे गिलसाठी वेस्ट इंडिजविरोधात होणारा दुसरा कसोटी सामना महत्वाचा आहे.  


वनडेमध्ये द्विशतक -


एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन गिल याने द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. 2023 मध्ये न्यूझीलंडविरोधात गिल याने 208 धावांची खेळी केली होती. गिल याने भारतासाठी आतापर्यंत 24 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये 66 च्या सरासरीने 1311 धावा केल्या आहेत. पाच अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. शुभमन गिल याने सहा टी 20 मध्ये 202 धावा केल्या आहेत.