Asia Emerging Cup 2023 : इमर्जिंग एशिया कप 2023 मध्ये भारता ए संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने नेपाळचा 9 विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बुधवारी भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने नेपाळचा सहज पराभव केला. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 39.2 षटकात 167 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल भारताने 22.1 षटकात एका विकेटच्या मोबदल्यात सहज आव्हान पार केले. 

Continues below advertisement


भारताकडून सलामी फलंदाज अभिषेक शर्मा याने दमदार फलंदाजी केली. अभिषेक शर्मा याने 69 चेंडूत 87 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि दोन षटकार लगावले. 






बुधवारी (19 जुलै) भारत ए आणि पाकिस्तान ए या संघामध्ये सामना होणार आहे. कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. 


नेपाळविरोधात सहजासहजी विजय 


प्रथम फलंदाजी करताना नेपाळचा संघ 39.2 षटकात 167 धावांपर्यंत मजल मारु शकला. नेपाळसाठी कर्णधार रोहित पोडेल याने सर्वाधिक 65 धावा चोपल्या. तर  गुलशन झा याने 38 धावांची खेळी केली. भारत ए संघाच्या गोलंदाजांनी नेपाळविरोधात भेदक मारा केला. नेपाळच्या सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.  नेपाळ च्या आसिफ शेख 07, कुशल भुर्तेल 00, देव खानल 15, भीम शार्की 04, कुशल मल्ला 00 आणि सोमपाल 14 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. टीम इंडियाकडून निशांत सिंधू याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर राजवर्धन हंगरकेकर याने नेपाळच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवला. हर्षित राणा याने दोन विकेट घेतल्या. 


अभिषेक शर्माची वादळी खेळी, साई सुदर्शनची दमदार साथ


नेपाळने दिलेले 168 धावांचे आव्हान टीम इंडिया ए संघाने सहज पार केला. एक विकेटच्या मोबदल्यात टीम इंडियाने हे आव्हान सहज पार केले. इंडिया ए साठी अभिषेक शर्मा याने 69 चेंडूत 87 धावांची खेळी केली. याखेळीदरम्यान अभिषेक शर्मा याने 12 चौकार आणि 2 षटकार लगावले. अभिषेक शर्मा याला साई सुदर्शन याने चांगली साथ दिली, त्याने अर्धशतकी खेळी केली. साई सुदर्शन याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. विकेटकीपर ध्रुव जुरैल याने 12 चेंडूमध्ये 2 षटकारासह 21 धावा केल्या.