IND vs WI 1st T20I Top-5 Players: आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडिअममध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. याच मैदानावर झालेल्या वनडे सामन्यात भारताने 200 धावांनी विजय मिळवला होता. टी20 मालिकेत भारतीय संघाने अनुभवी खेळाडूंना आराम दिलाय. आगामी टी20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी दिली आहे. आजच्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजमधील काही खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. पाहूयात आघाडीच्या पाच खेळाडूंबद्दल... 


1 सूर्यकुमार यादव


टी 20 क्रिकेटमधील अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतोय? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण, तीन सामन्याच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादवची बॅट शांतच होती. सूर्य कुमार यादव याला एकही अर्धशतक ठोकता आले नव्हते. आता टी 20 मध्ये सूर्या काय करणार ? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


2 ईशान किशन


विकेटकीपर फलंदाज ईशान किशन याने वेस्ट इंडिज दौऱ्यात खोऱ्याने धावा चोपल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशन याने भारताला वेगवान सलामी दिली. ईशान किशन याने तिन्ही वनडे सामन्यात अर्धशतके ठोकत धावांचा पाऊस पाडला. ईशान किशन वनडे मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता. ईशान किशन याने तीन वनडे सामन्यात 62 च्या सरासरीने 184 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे आता टी 20 मध्ये ईशान किशन कशी फलंदाजी करतो? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


3 निकोलस पूरन


वेस्ट इंडिजचा स्टार पलंदाज निकोलस पूरन सध्या तुफान फॉर्मात आहे. नुकत्याच झालेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली होती. निकोलस पूरन याने एमआय न्यूयॉर्कचे नेतृत्व केलेय. फायनलमध्ये पूरन याने 53 चेंडूत 137 धावांची वादळी खेळी केली होती. या डावात त्याने 10 चौकार आणि 13 षटकार ठोकले आहेत. निकोलस पूरन आता टी 20 मध्ये कशी कामगिरी करतो... हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 


4 काइल मेयर्स 


वेस्ट इंडिजचा विस्पटोक फलंदाज काइल मेयर्स याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती. आतापर्यंत वेस्ट इंडिजसाठी त्याने 24 टी 20 सामन्यात 136 च्या स्ट्राइक रेटने 482 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीसोबत तो गोलंदाजीतही प्रभावी ठरू शकतो. 


5 शिमरोन हेटमायर 


फिनिशर शिमरोन हेटमायर याने आतापर्यंत प्रभावी फलंदाजी केली आहे. आक्रमक फलंदाजी करत त्याने आतापर्यंत सर्वांचीच मने जिंकली आहेत. त्याने आतापर्यंत 50 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 797 धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे.